अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा

भोजराजाच्या दरबारात असलेला महाकवी कालिदास याच्यापुढं आपलं तेज पडत नसल्यामुळे, त्याच्यावर आतून जळणारे बरेच विद्वान व कवी होते. त्यांत शतंजय हाही एक कवी होता. एकदा त्यानं आपलं महत्त्व वाढविण्यासाठी व विशेषकरुन कालीदासाला बदनाम करण्यासाठी भूर्जपत्रावर एक श्लोक लिहिला व ते भूर्जपत्र आपल्या शिष्याला भोजराजाकडे पोहोचतं करायला सांगितलं.

गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्याचा शिष्य़ ते भूर्जपत्र हाती घेऊन राजाकडे चालला असता वाटेत त्याची व कालीदासाची भेट झाली, ‘ हा शतंजय – शिष्य राजाकडे चालला असावा.’ असं वाटल्यावरुन कालिदासानं त्याला मुद्दाम विचारलं, काय रे वत्सा ? किती लांब चालला आहेस?’

शतंजय कवीच्या शिष्याला श्लोक काय आहे, याची कल्पना नसल्यामुळं, तो सहज बोलून गेला, ‘माझ्या गुरुंनी या भूर्जपत्रावर लिहिलेला एक श्लोक, त्यांच्या आज्ञेवरुन मी भोजमहाराजांना द्यायला चाललो आहे.’

कालीदासाने ते भूर्जपत्र आपल्या हाती घेऊन तो श्लोक वाचला. तो पुढीलप्रमाणे होता –

श्लोक
अपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम /
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजय: //

(भावार्थ- माघ कवीच्या काव्यात शंभर, ‘भारता’ त तिनशे तर कालिदासाच्या काव्यांत किती अपशब्द (शिव्या) आहेत, त्याला गणनाच नाही, शतंजय कवीला मात्र ( त्या कवीचे हे दोष दाखवून देण्यासाठी) एकदाच अपशब्द (शिवी) वापरावा लागलो.)

शतंजय कवीने हा श्लोक आपली बदनामी करण्यासाठी लिहिला असल्याचे पाहून कालिदास त्या शतंजय शिष्याला मुद्दाम म्हणाला, ‘अरे वा: ! फ़ारच छान लिहिलाय श्लोक तुझ्या गुरुंनी ! फ़क्त नजरचुकीनं एका शब्दाला काना द्यायचा राहून गेलाय, देऊ का मी तो काना ?’

शतंजय शिष्य म्हणाला, ‘वा: ! हे काय विचारणं झालं? ती चूक जरुर दुरुस्त करा. माझ्या गुरुंना कमीपणा येता कामा नये.’

कालीदासाने श्लोकातील ‘अपशब्द’ या शब्दातल्या ‘अ’ ला काना दिला, आणि त्याचा ‘आपशब्द’ असा शब्द बनवला. त्यामुळे तो श्लोक पुढीलप्रमाणे बनून, त्याचा अर्थही पार बदलून गेला.

श्लोक
आपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम /
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजय: //

(भावार्थ- माघ कवीच्या एका ‘आप’ म्हणजे पाणी या शब्दाला समानार्थी असे एकूण शंभर शब्द आहेत. भारतात त्यांची संख्या तिनशे आहे. कालिदासाच्या काव्यात तर एका पाण्याला समानार्थी असे किती शब्द आहेत, त्याला गणना नाही, फ़क्त (शब्दसंपत्तीच्या बाबतीत दरिद्री असलेल्या) शतंजय कवीच्या काव्यात आप-म्हणजे पाणी- हा एकच शब्द प्रत्येक ठिकाणी वापराला गेला आहे.)

शतंजय -शिष्याने तो श्लोक भोज राजाकडे पोचता केला. राजाने भर दरबारात तो श्लोक वाचून दाखविताच कालिदासाची मान उंच झाली, तर शतंजय कवीची मान लज्जेने खाली गेली !