जयप्रभा स्टुडिओच्या विक्री विरोधात मोर्चा

सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर

सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सोमवारी स्पष्ट केले की, जयप्रभा स्टुडिओ विक्री विरोधातील याचिका आम्ही कोर्टात दाखल केली आहे. पण, यावर जर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही त्यांचे पुतळे जाळून त्यांचा निषेध करु.

जयप्रभा स्टुडिओच्या विक्री विरोधात महामंडळातर्फे एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचे कटाऊट्स तयार करुन त्यांवर काळे फासण्यात आले. चित्रकर्मींनी इशारा दिला की, जयप्रभा स्टुडिओचा जेव्हा अर्थिक व्यवहार पूर्ण होईल तेव्हा या ठिणगीतले रुपांतर आगीत होईल व आंदोलनाची तीव्रता अधिक वाढेल. जे कलाकार मोर्चात सहभागी होते त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. त्यांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या विरोधातील घोषणाबाजी करत कॅमेरा मानस्तंभापासून जयप्रभापर्यंतचा रस्ता हादरुन सोडला.

या मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाची दुपारी साडे तीन वाजता पूजा करण्यात आली. ‘लतादीदी हाय हाय’, ‘सुरेश वाडकर इस्टेट एजंट’, ‘जयप्रभा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, अशा घोषणा मोर्चाच्या वेळेस करण्यात आल्या व जयप्रभा स्टुडिओपर्यंत हा मोर्चा येऊन थांबला. जयप्रभा स्टुडिओचे व्यवस्थापक पाटील यांना प्रसाद सुर्वे यांनी निवेदन दिले.