आपला प्रदेश

भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे. अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. महाराष्ट्राच्या घडणीला भौगोलिक वैशिष्टये कारणीभूत आहेत हे खरे; पण त्याबरोबरच संस्कृती आणि राजकीय जीवन या क्षेत्रांतील लक्षणीय वेगळेपणामुळे भारतीय संघराज्यात महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या भूगोल, इतिहास आणि संस्कृती मुख्यत: मराठी साहित्य- यांचे निरीक्षण केले तर महाराष्ट्राच्या अस्मितेची कारणे आणि तिची व्यवच्छेदक लक्षणे स्पष्ट दिसू लागतात.

पश्चिम सह्याद्री,माथेरान

पश्चिम सह्याद्री,माथेरान

महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे, तो हिमालया इतका विस्तीर्ण आणि उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे, त्याचा देह मजबूत आहे आणि तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असल्याने पावसाळी वारे त्याच्यावर आदळत असतात. त्याच्याशी काटकोन करून सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्वेकडे गेलेल्या आहेत. या दोघा रक्षकांनी दक्षिण पठाराचे संरक्षण केले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सरासरी चाळीस मैलांवर तो उभा आहे; आणि तेवढ्या भूमीला कोकणपट्टी म्हणतात. पर्वताच्या पश्चिम बाजूला ढाळ मोठा आहे. तेथे पाऊस पुष्कळ पडतो आणि पश्चिम वाहिनी नद्यांना, छोट्या झऱ्यांना, पऱ्ह्यांना पाणी चांगले असते. तरीही जमीन खडकाळ असल्यामुळे कोकणातील शेती अतिशय कष्टांची असते. जीवनसंघर्ष उग्र असतो. अशा परिस्थितीत माणसेही सहनशील, काटक, बुध्दिमान आणि काहीशी रांगडी बनली असली तर नवल नाही. सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे. वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे, तर नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे. पण एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते. एका मुडपलेल्या पंखावर कोकण आणि दुसऱ्या पसरलेल्या पंखावर देश असा सह्याद्री उभा आहे. त्याच्या पूर्वेकडच्या उतारावर त्याच्या शाखांमुळेच खोरी निर्माण झाली आहेत, त्यांना मावळ म्हणतात. सह्य सातपुडाच्या सपाट माथ्यांवर ठायीठायी किल्ले उभे आहेत. एवढे दुर्ग जगात दुसऱ्या कोणत्याही पर्वतावर नाहीत. याचा अर्थच असा की मराठ्यांना या सह्याद्रीने भक्कम संरक्षण दिलेले आहे आणि त्या बळावरच आक्रमकांचा प्रतिकार ते करू शकले. याशिवाय डोंगराकड्यांवर अनेक मंदिरे बांधलेली आहेत. मुळातच चित्रिविचित्र असलेली सह्याद्रीची मस्तके किल्ल्यांनी आणि मंदिरांनी नटलेली असल्यामुळे सह्याद्रीच्या परिसरातील क्षितिजरेषा चित्राकार झालेल्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीत कोरलेल्या गुंफांतून प्राचीन काळची सौंदर्याची लेणी आपण पाहू शकतो. प्रचंड खडक, ताशीव कडे, मुकुटावर शिखरे, उंच‍उंच बोडके सुळके,अधूनमधून किर्र झाडीने भरलेलेया दऱ्या अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सह्याद्रीला फार वेगळे सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे.

भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही. कुठे माळ, कुठे खडकाळ, कुठे हिरवळ, कुठे रेताड, कुठे घनदाट रान, कुठे उजाड ओसाडी. कुठे पायऱ्यापायऱ्यांची, तर कुठे साफसपाटीची- म्हणाल तसली जमीन महाराष्ट्रात आहे. सृष्टीचीही अनेक रूपे. कुठे काटेरी झुडुपे, कुठे साग पळसांची राने, तर कुठे माडपोफळींची, आंबेफणसांची गर्दी. तरीही एकंदर चित्र पाहावे तर माणसाच्या जिजीविषेला आणि कर्तृत्वाला कठोर आव्हान देणारा हा प्रदेश आहे.

अशा प्रदेशातली माणसे म्हणूच घट्टमुट्ट आणि अभिमानी झालेली आहेत. जिथे खुषीची सोपी शेती असते तिथला जीवनसंघर्ष तुलनेने सोपा असतो. पण खडकाळ जमिनीशी आणि दुष्काळी परिस्थितीशी कायम मुकाबला करणाऱ्या मरहट्ट्यांची परिस्थिती वेगळी आहे. आठव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते, `मराठे सुदृढ आणि सावळे असतात; सहनशील, अभिमानी आणि कलहप्रिय असतात. दिल्याघेतल्याची भाषा फार करतात,’ असे हा ग्रंथकार म्हणतो. मराठी माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे मात्र नाहीत. महाराष्ट्र ही अनेक मानववंशाची मीलनभूमी आहे, अर्थातच मराठ्यांची लक्षणे वांशिक नाहीत. त्यांचे स्वभावविशेष भूगोलाने, सृष्टिवैचित्र्याने निर्माण केलेले आहेत. मराठे कलहप्रिय अभिमानी असतील पण प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत. मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवल समाज आहे. ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. पण वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत. चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग याने महाराष्ट्राचे अवलोकन केल्यावर लिहिले आहे: `येथील लोक धाडसी, उमदे, परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत. विद्याभ्यासाचे ते चाहते आहेत. उपकारकर्त्याचे उपकार ते कधीही विसणार नाहीत; परंतु कोणी अपमान केला. तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत. नि:शस्त्र माणसावर तो बेसावध असताना ते कधीही हल्ला करणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करावयाचा आहे, त्याला ते पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे त्याला शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणाऱ्या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील.”

ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने व्यापक स्वरूप ध्यानात घेतल्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा थोर भाग्यविधाता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावयास हवे. यादवकाळानंतर साडेतीनशे वर्षेपर्यंत बहामनी सुलतानांच्या अमलाखाली महाराष्ट्र आला होता. या राजवटीच्या खुणा महाराष्ट्रातील भग्नावशेषांत जशा दिसतात. तशा मराठी भाषेत घडून आलेल्या अनेक बदलांतही दिसतात. मराठी शब्दसंपत्तीत अरबी आणि फारसी वाणाच्या शब्दांची मोठी भर या काळात पडली. अपभ्रंश भाषांचे लेवाडेपण मराठीत नाही. तिच्यावर संस्कृतीचे बेमालूम कलम करून सिद्ध झालेल्या मराठी भाषेची वीण चांगलीच मजबूत आहे. अरबी, फारसी शब्दांचा प्रवाहही मराठीने रिचवून टाकला आणि तोही असा की भाषा दुबळी होण्याऐवजी तिचे सामर्थ्य आणि देखणेपण वाढले. हे घडत असताना राजकीय आणि सामजिक दृष्ट्या मात्र महाराष्ट्राचा विपत्काल ओढवलेला होता. गुलामीचे जिणे महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते. उत्तरेतील मोगल सम्राटांची नजरही महाराष्ट्राकडे वळल्यावर तर हे ग्रहण आता कधीच सुटणार नाही असे वाटून जनसामान्यांची मने अगतिक झाली होती. वर्षांमागून वर्षे, शतकांमागून शतके उलटली तेव्हा कोठे मराठा सरदार दरकदार जरा डोके वर काढू लागले आणि शहाजी राजे भोसले बहामनी सुलतानांच्या सिंहासनामागचे सूत्रधार बनले. या सुलतानांचे जोखड झुगारून स्वराज्यांची स्थापना करावी हे धाडस मात्र शहाजी राजांना झाले नाही किंवा झेपले नाही. ते महत्कार्य त्यांचा पुत्र शिवाजीच करू धजावला. शहाजी आणि शिवाजी या पिता पुत्रांमधील पिढीचे अंतर जबरदस्त म्हटले पाहिजे. स्वजनांची मानहानी थांबवण्यासाठी, दीनदुबळ्यांचा छळ नाहीसा करण्यासाठी आणि स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी दक्षिणेतील सुलतान आणि दिल्लीचा सम्राट या दोहोंविरूद्ध तरवार उपसणाऱ्या या महापुरुषाने लोकोत्तर गुणांच्या बळावर महाराष्ट्रात स्वराज्यांची प्राणप्रतिष्ठा केली. छत्रपतींचे चरित्र आणि चारित्र्य यांनी प्रभावित झालेल्या मराठ्यांनी पुढे अवघ्या हिंदुस्तानच्या संरक्षणाचा वसाच घेतला मराठ्यांच्या यशापयशांची पुष्कळ मीमांसा झाली आहे, होत आहे आणि पुढेही होत राहील. परंतु राष्ट्रीय स्वभिमानाचा आणि अन्याय प्रतिकाराचा तेजस्वी आदर्श मराठ्यांनी निर्माण केला हे ऐतिहासिक सत्य अबाधितच राहील.