अभियन-स्त्री उपजत कला

स्त्री ही मुलगी असते; कुणाचि तरी पत्नी होते, आई होते. जीवनात तिला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात आणि या भूमिका पार पाडताना तिला आपल्या अंगभूत गुणांचा वेळोवेळी उपयोग करावा लागत असतो. आईशी वागताना लडिवालपणे, मुलीशी वागताना प्रेमभरानं, मुलांशी वागताना ममतेनं, ईश्वरानं तिच्या हृदयात या भावनांचा सुरेख संगम करून ठेवलेला आहे. क्षणोक्षणी तिला भावनांच्या विविध पातळ्यांवर वावरावं लागतं. तो तिचा निसर्गदत्त अभिनयच अस्तो.इतर अभिनयासारखे त्यात नाटकीपण नसते. आणि म्हणूनच स्त्रियांच्या अभिनयगुणाचा विकास करण्याच्या दृष्टीनं फारसं करावं लागत नसतं. पुरुषाच्या बाबतीत मात्र त्याच्यात अभिनय पेरावा लागत असतो. स्त्रियांच्या स्वाभाविक अभिनयाला फुलवायचं असतं.

दिग्दर्शकानं स्त्रीला शिकविताना त्यांना जास्त अभिनय शिकविण्याचा प्रयत्न करता, समोर असलेल्या भूमिकेचा अर्थ, स्पष्टीकरण सांगावं. स्त्रीला खरं म्हणजे विशेष असं शिकविण्याची आवश्यकताच नसते. तसं शिकविण्याच्या प्रयत्नात उल्ट नुकसानच होतं. तिच्या स्वाभाविक अभिनयात कृत्रिमता येते. पाचसात वर्षांपर्यंतची मुलं ही संस्कार क्षम असतात. त्या वयात मुलांचे गुण-आपल्याला जाणवायला लागतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते काही खोटं नाही. या वयात मुलींना स्नेहसमेलनातील नाटकामधून भाग घ्यायची संधी मिळत असते. त्यातूनच भविष्यातील अभिजात कलाकारांची मुहूर्तमेढ रोवली जात असते. त्यातूनच भविष्यातील कलाकार निर्माण होत असतात. पालकांनी आपल्या मुलीला नाट्याभिनयाची आवड असेल तर तिला संधी द्यायला हवी. पालकांनी धाडस करून मुलीच कलाबीज पोसणं हे जितकं महत्त्वाच असतं. तितकचम महत्त्वाचं म्हणजे मुलींनी नाट्यसृष्टीतल्या वातावरणाची प्रत्यक्ष संबंध न ठेवता नाटकात कामं करावीत. सध्याचे नाटकातलं वातावरण, इतर परिस्थिती पाहून पुष्कळसे पालक आपल्या मुलींना नाटकाट काम करायला परवानगी देत नाहीत. पण याबाबतीत धाडसी निर्णय घ्यायला हरकत नाही. मुलीनं मात्र साथ द्यायला हवी. पाण्यात राहूनही कोरडं राहाण्याची कला आत्मसात करायला हवी.

गेली ५३ वर्षे मी स्वतः नाट्यसृष्टीत राहूनही त्या नाटकी, बेगडी आणि बहुढंगी वातावरणापासून दूर राहू शकलो आहे, आणि त्या मुळेच माझी कला ताजी राह्यली आहे, जिवंत राह्यली आहे. पूर्वीच्या काळी मुलींनी नाटकातून काम करणं अत्यंत अयोग्य समजलं जात होत. पण आता मात्र समाज किंवा कुटुंबातून मुलींना विरोध तर होत नाहीच, परंतु उत्तेजनच मिळत आहे. सध्या नाटककलेलाही विविध अंकुर फुटत आहेत. कितीतरी विषय नाटकांमधून हाताळले जात असतात. स्त्री विषयांवर तर अक्षरशः हजारो नाटकांचा जन्म होत असतो. अशा नाटकांमधून वास्तवतेच्या नावाखाली अनेक अप्रदर्शनीय गोष्टीचं प्रदर्शन मांडलेलं असतं. हे अयोग्य असतं. पण त्या गोष्टी कोणी थांबवू शकत नाही. अशा नाटकांमधून कामं करायची की नाहीत हे मात्र मुलींनी ठरवायला हवं. कला ही संज्ञा आहे वास्तवतेच्या नावाखाली काहीही दाखवणं ही कला होऊ शकत नाही. लहानपणी हौसेनं नाटकातून कामं केल्यानंतर आपली कला पुढं विकसित करायची की नाही, हेही मुलींच्याच हातात असतं. कलेची आव्ड असेलतर काहीही अडचणी आल्या तरी त्या दूर करून आपल्या कलेचा विकास त्यांनी करून घ्यायला हवा.

लग्न झाल्यानंतर स्त्रियांना नाटकात काम करायला अनेक अडचणी येतात. विरोध होतात. पती, मुलं, आजारपण संभाळता संभाळता तिची कला संपून जाते. अशा वेळी संसार हे प्रथम कर्तव्य असलं तरी, संधी मिळाली तर ती सोडू नये. पतीनं, घरात तिच्या कलेच्या विकासाला वाव द्यायला हवा, हातभार लावायला हवा. सर्वस्वी नाटकाला वाहून घेणाऱ्या स्त्रियांची गोष्ट वेगळी असते. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं जीवनच नाट्यमय असतं. हल्लीच्या काळात होणाऱ्या नाट्यस्पर्धा या अभिनयगुणांना पुरकच आहेत. वर्षभर कितीतरी स्पर्धा होत असतात. त्यामधून शेकडो नवे चेहरे पुढं येतं असतात. अशा नवोदितांना संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळत गेलं तर रंगभूमी खऱ्याखुऱ्या अर्थानं संपन्न होत राहील. मात्र नात्यशिबिरे, नाट्यशिकवण्या, नाट्याभिनयाचे क्लासेस यांच्यावर माझा विश्वास नाही. शिबिरं ही पुस्तकी शिक्षणं देत असतात. अभिनय हा अभिजात असावा लागतो. त्याला शास्त्रशुद्धता आणता कामा नये तो सहज असावा. त्या दृष्टीनं शिबिर निरोपयोगी ठरतात.
रंगभूमीवर अभीनय करणऱ्या स्त्रीला गायनाचे आणि नृत्याचेही अंग असणे आवश्यक आहे.

संगीतात जसा स्वर असतो तसाच संवदातही असतो. नृत्यात जशी लय असते, तशी चालण्यातही असते. चालण्यानं आणि बोलण्यात सहजपणा असणारी जाण आणि या गोष्टींना सौंदर्याची साथ असेल तर नाट्याभिनय ही कला दुष्प्राष्य नाही. समज ही अनुभवानं येत असते. इतर कलांप्रमाणेच नाट्यकलेतही निष्ठा, चिकाटी आवश्यक असते. मुली जात्याच कष्टाळू आणि कामाशी प्रामाणिक असल्यामुळे त्या कलाक्षेत्रात पुढे येतात. आपली हौस म्हणून मुलीला नाटकात पाठवायचं, असा विचार पालकांनी न करता स्वतः मुलीला नाटकात काम करायची आवड आहे की नाही हे पाह्यला हवं. कारण आवड ही पहिली गोष्ट असते. आवड नसली तर इतरा अनुकूलता असूनही कोणत्याही कलेचा विकास होऊ शकत नसतो.