अभ्युदयाची आकांक्षा

हिंदू हा उत्सप्रिय, समारंभप्रिय आहे असे म्हटले जाते. अन ते खरेच आहे. भौतिक प्रगती व आध्यात्मिक विकास या दोन्ही अंगांनी मानवी जीवनाचा विचार हिंदूंनी केला आहे. एकाच बाबीवर जोर दिला गेला तर काय होते याचा अनुभव आपन घेतोय आहोत. जगातील सर्वात अधिक समृद्ध देश असूनही व्यवसनाधीनता, आत्महत्या व घटस्फोटांचे वाढते प्रमाण, कुमारी माता व त्यांची अनाथ मुले, वाढती हिंसा व नृशंसता आदी प्रश्नांनी आज अमेरिका त्रस्त आहे. तसेच ज्या ज्या वेळी भौतिक जीवनाकडे दुर्लक्ष करून केवळ आध्यात्मिक जीवनाकडेच अधिक लक्ष दिले जाते, त्या वेळी ते राष्ट्र दुर्बल, विपन्न बनते व आक्रमणांचा बळी ठरते, हे आपण अनुभवलेलेच आहे. पण मुळामध्ये हिंदू विचारधारेत अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हींचे संतुलन असल्याने भौतिक जीवनासंबंधी उदासीन दृष्टीकोन न बाळगता जीवन प्रापंचिकांनी उत्साहाने व समरसून जगावे म्हणुनच अनेक सणा-समारंभाची योजना आहे. हे घरोघरी साजरे केले जातात व त्यातून अभ्युदयाची आकांक्षा, आम्ही ठरविलेले घडवून आणू शकतो, हा आत्मविश्वास व विजिगीषु वृत्ती निर्माण होते.