भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना जाळले

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राज्यातील दंडेलशाही किती पराकोटीला गेली आहे याचं ढळढळीत उदाहरण सामोरे आले आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करणा-या टोळीवर कारवाई करणा-या अतिरिक्त जिल्हाधिका-लाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडजवळ घडला आहे.

मनमाडचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे चांदवडहून नांदगाव येथे तहसील कार्यालयात सरकारी बैठकीसाठी जात होते. त्यावेळी मनमाडपासून ८ किलोमीटर अंतरावर असणा-या एका धाब्याजवळ त्यांना काही टँकरमधून अवैध व्यवहार होताना आढळले. येथे चौकशी करण्यासाठी गेले असता या भेसळखोरांशी त्यांची बाचाबाची झाली. या वादादरम्यान भेसळखोरांनी भेसळखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. अंगांवर शहारे आणणार्‍या या घटनेत सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला.

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळले

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळले

यावेळी त्यांच्यासोबत कैलास गवळी हा गाडीचा चालक आणि राजू काळे हा त्यांचा स्वीय सहायक होता. या दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न झाला. पण ते पळ काढण्यात यशस्वी झाले आणि त्यांचा जीव वाचला. दरम्यान, पोपट शिंदे आणि त्यांच्या टोळीने हा प्रकार केल्याचे स्पष्ट होत असून, पोपट शिंदेही या घटनेत भाजला आहे. त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असणा-या पानेवाडी येथे मुंबईतून जाणा-या तेलवाहिन्या एकवटतात. तेथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ करण्याचे रॅकेट चालते. या भेसळखोरांवर वारंवार कारवाई होत असूनही हे प्रकार थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सोनावणे यांचा देह मृतावस्थेत सापडला. दरम्यान , या घटनेची चौकशी सुरू केली असून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल , असे नाशिकचे जिल्हाधिकारी पी. वेल्लारसू यांनी सांगितले. तसेच या हल्लेखोरांविरोधात मोक्का लावण्यासंदर्भात कारवाई सरकार करेल , असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दोषींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे.