अधिकाराचा विकास

व्यक्तीला हा कर्तव्याचा अधिकार प्राप्त झाला की, जणू काही तो अखिल विश्वाचा सम्राटच बनतो, असे म्हणायला हरकत नाही. हे नवीन खेळणे हातांत आले की, व्यक्ती त्याचा उपयोग आधी स्वतःसाठी प्रयोग करून करते. माझे स्वसंबंधी कर्तव्य – उत्तम देहसंपदा, ज्ञानोपासना, सद्गुणांचा विकास अन या सगळ्या गोष्टींचा सत्कर्यासाठी उपयोग करण्याची बुद्धी – या सर्व गोष्टी प्राप्त करणे हे झाले स्वसंबंधी कर्तव्य.
यातूनच निर्माणहोती कुटुंबासंबंधी कर्तव्यभाव. कुटुंबीयांचा विकास व्हावा, त्यांची सुरक्षितता, शिक्षण, स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य व आवश्यक गोष्टींची पूर्तता यासाठी हा ‘ स्व ’ प्रयत्नशील राहतो. पण तेवढ्यापुरतीच त्याच्या कर्तव्याची मर्यादा असत नाही. शेजारीपाजारी – गाव – तालुका – म्हणजे समाज – राष्ट्र – पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती आदी सजीव सृष्टी – चराचर सृष्टी – परमेष्टी असे हे वर्तुळ विस्तारत जाते.