आगळेपणा

अशी ही दिनचर्या सामान्यतः सर्वकाळी, सर्वत्र सर्वांना पाळता येईल अशी आहे. व्यक्ती, कुटुंब, सामाजिक संस्था ( मठ, आश्रम, निवासी विद्यालये, अनाथ अपंगगृहे, भरविली जाणारी वेगवेगळी शिबिरे ) याचबरोबर जरूर तो बदल करून विद्यालये, कारखाने, कार्यालये यांच्यातही पाळता येईल. प्रयोगांती सिद्ध झाले आहे की, ज्या कार्यालयात वा कारखान्यांत सामूहिक प्रार्थना होऊन कामाला सुरुवात केली जाते, तेथे शांतता राहते व विकासाचा वेग वाढतो. एकत्वाची आणि सहकार्याची भावना रुजते. वरिष्ठ-कनिष्ठ यांतील दरी कमी होते. वेळ पाळण्यासाठी धावतपळत आलेल्या व्यक्तीचे थोडे डासळलेले शारीरिक व मानसिक संतुलन मूख पदावर येते. मन एकाग्र झाल्याने प्रसन्न मनाने कामाला सुरुवात होते.

आज जीवनाचा वेग वाढला असल्याने तर हे सर्व संस्कार होण्याची आवश्यकता अधिकच जाणवते आहे. थोडा फेरफार करावा लागेल हे मान्य. पण आज आम्ही या गोष्टी अजिबात सोडल्या आहेत. काअर्ण आमच्या आधुनिकतेविषयीच्या अवास्तव कल्पना ! मेकॉले शिक्षण पद्धतीने निर्माण झालेला न्यूनगंड, अंधानुकरणाची प्रवृत्ती. याचबरोबर भल्याबुऱ्यांचा विचार करण्याची शक्ती आपण गमावून बसलो आहोत. एखादी गोष्ट ठरवून ती पार पाडण्याची जिद्द आपण विसरलो आहोत. कष्टसाध्य नाही तर सहजसाध्य गोष्टींच्या मागे लागलो आहोत. यमनियमांची बंधने झुगारून स्वैर होतो आहोत. ‘ लवकर निजे लवकर उठे तया आरोग्यज्ञानसंपत्ति प्राप्त होये ’ ही गोष्ट धाब्यावर बसविली गेली आहे. सकाळच शांत, प्रसन्न वातावरण, शुद्ध मोकळी हवा, रंगांची उधळण करत उगविणारे सूर्यबिंब- हळूहळूअ उमलणारी फुले, कलकलणारे पक्षी व एकूणच निसर्ग यांचे दर्शन आज दुर्मिळ झाले आहे. देवाला नमस्कार करणे म्हणजे अंधश्रद्धा, व्यायाम, वाचन, चिंतन -अनावश्यक गोष्टी वाटू लागल्या आहेत. या गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत. स्नानमंत्र, भोजनमंत्र म्हणण्याइतका संयम पाळणे नकोसे झाले – परिणामतः आपली पशुत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ‘ मी ’ सर्वश्रेष्ठ ठरला आहे. पाश्चात्य संस्कृतीतला भोगवाद व व्यक्तिवाद यांच्या जाळ्यात आम्ही अडकतो आहोत. वेळीच त्यातून सुटायला हवे आहे व त्यासाठि समाजहिताचिंतक, निःस्वार्थी, समाजहितैषींनी वर्षानुवर्षांच्या प्रयोगानंतर काढलेल्या निष्कर्षानुसार आखलेल्या भारतीयांच्या जीवनपद्धतीविषयींच्या मूळ संकल्पना समजावून घेणे आवश्यक झाले आहे. त्यात कुटुंबजीवनाचे स्थान पायाभूत आहे.