अहिवंत किल्ला

अहिवंत किल्ला Ahiwant fort – तब्बल ४००० फूट गिरीदुर्ग प्रकारातील अहिवंत किल्ला नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेत असुन ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा किल्ला आहे.

अहिवंत किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे अथवा मनमाडमार्गे या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापूतारा मार्गेदेखील जाता येते.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

अहिवंत गडाचा माथा फार मोठा आहे. संपूर्ण माथा फिरण्यास १ दिवस लागतो. किल्ल्याच्या सोंडा पूर्व, पश्चिम, वायव्य आणि ईशान्य कडे मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत. किल्ल्याच्या ईशान्य बाजूस एक गुहा आहे. पण ती राहण्यास अयोग्य आहे. दक्षिण बाजूला असणार्‍या कड्यामध्ये एक गुहा आहे. ती राहण्यास योग्य आहे. गुहेपासून १० मिनिटांवरच पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. दरेगावच्या बाजूने किल्ल्यावर पोहचल्यावर आपल्याला दोन पडक्या दरवाजांचे अवशेष दिसतात. आजुबाजुला अनेक मोठ्या पडक्या वाड्यांचे अवशेष पडलेले आहेत. यावरून किल्ला एक मोठे लष्करीय ठाणे असावे असे वाटते. अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीपण आढळतात. या बाजूच्या वाटेने किल्ल्यावर येतांना अनेक गुहा कोरलेल्या आढळतात. सद्यस्थितिला यांचा उपयोग मात्र गोठ्यासाठी होतो. किल्ल्यावर फिरतांना दोन ते तीन पाण्याची तळी आढळात. एका मोठ्य तळ्यापाशी देवीची एक मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती सप्तश्रुंगी देवीच्या मूर्तीशी साम्य असल्यासारखी दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा

१. नाशिकमार्गे : नाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहून नांदुरी रस्त्यावरूनच किल्ल्याचे दर्शन होते. वणी नांदुरी रस्त्याच्या अलिकडे १ कि.मी. अंतरावर एक ठळक वाट डावीकडे असणाऱ्या डोंगरसोंडे पर्यंत जाते. डांबरी रस्त्यापासून येथपर्यंत येण्यास १ तास पुरतो. डोंगरसोंडेवर चढून गेल्यावर आपण एका खिंडीत पोहचतो. खिंडीतून पलिकडे जाणारी वाट दरेगावात जाते तर समोर जंगलात शिरणारी वाट थेट गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जाते. खिंडीपासून गडावर जाण्यास १ तास पुरतो.

२. पिंपरी अचला मार्गे : दुसरी वाट जरा लांबची आहे. वणीहून पिंपरीअचला मार्गे पिंपरीपाड्यात पोहचावे. पिंपरीवाड्यातून समोरच्या डोंगरसोंडेवरील मंदिरापर्यंत जावे. येथून डावीकडे जाणारी वाट अचला किल्ल्याकडे तर उजवीकडे जाणारी वाट बेलवाडीत उतरते. येथून बेलवाडी गाठण्यास अर्धा तास लागतो. बेलवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास २ तास लागतात.

दरेगावमार्गे किल्ल्यावर जाण्यास अडीच तासांचा वेळ लागतो तर बेलवाडीमार्गे २ तासांचा वेळ लागतो.