अनेक एकलव्यांचा द्रोणाचार्य

गौतम राजाध्यक्ष

गौतम राजाध्यक्ष

बालवाडीत असताना बाईंनी शाळेत एका परीची गोष्ट सांगितली होती. ती परी एका गावात यायची आणि चांगल्या वागणार्‍या मुलांच्या डोक्यावर एक छडी फिरवून त्यांना खूप सुंदर बनवायची. ‘‘तुम्हीही चांगले वागा पोरांनो, म्हणजे ती परी कधी भेटली तर तुम्हालाही सुंदर बनवेल.’’ हे शाळेत ऐकले, मनात राहिले आणि नकळत त्या परीचा शोध सुरूच राहिला. थोडे मोठे झाल्यावर पर्‍या वगैरे काही नसते हे कळले, पण त्या परीची छडी मला सापडली. ती छडी म्हणजे गौतम राजाध्यक्ष यांचा कॅमेरा. अनेक सामान्य चेहर्‍यांना त्यांनी सुपरस्टार केले. आज जे मोठे कलाकार आहेत ते या सिनेनगरीत पदार्पण करण्याआधी गौतमकडे गेले होते. अनेक वर्षे आपण पाहतो, कोणत्याही सिने कलाकाराचे अप्रतिम फोटो पाहिले की त्याखाली गौतम राजाध्यक्ष हेच नाव आढळते. १६ सप्टेंबर १९५० चा त्यांचा जन्म. मुंबईतील सेंट झेवियर्स हायस्कूल, फोर्ट येथे शालेय शिक्षण झाले. ‘‘मी नेहमी आवडीने अभ्यास केला. रोज काहीतरी नवीन माहिती मिळते ही गंमत वाटायची. परीक्षांचा किंवा पुस्तकांचा वैताग कधीच आला नाही.’’ असे ते सांगायचे. वर्गात पहिले येण्याकरिता काहीही कष्ट न घेता सतत बाजी मारत. पण कला रक्तात असल्यामुळे त्या दिशेलाही कल होताच. त्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून फोटोग्राफर्स होतेच. बाबा, काका, आत्या, तिचे यजमान या सर्वांना फोटोग्राफीचा नाद होता. घरात पाच कॅमेरे होते. सुट्ट्यांमध्ये घरातल्यांचेच फोटो काढण्यात गौतमचा वेळ जायचा. ‘‘संगीत, वाचन आणि चित्रपट पाहण्यातून वेळ मिळाला की लक्ष कॅमेराकडेच असायचे. भरमसाट कार्टून किंवा मॉल्सची भटकंती नसल्यामुळे छंदांना जोपासण्याकरिता माझ्या लहानपणी खूप वेळ मिळायचा’’ असे त्यांचे म्हणणे. त्याच काळात त्यांच्याकडे चित्रपटविषयक खूप मासिके यायची. त्यात प्रामुख्याने ‘मॉडर्न स्क्रीन’, ‘सिल्वर स्क्रीन’, ‘फोटो प्ले’ अशी मासिके-साप्ताहिके असायची. त्यातले फोटो पाहून हा फोटो कसा काढला असेल? यावर स्वत:शीच चर्चा व्हायची. चेहर्‍यांचा अभ्यास गौतमने फार लहान वयातच सुरू केला होता. एखादा चेहरा काय सांगत आहे हे फोटोकडे पाहून सांगणे हेच त्याचे खरे शिक्षण. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये केमिस्ट्रीची पदवी मिळवली खरी, पण आयुष्याची केमिस्ट्री फोटोग्राफीशी जुळलेली. त्यामुळे जीवनाने वेगळीच दिशा घेतली. ‘ऍडर्व्हटायझिंग ऍण्ड पब्लिक रिलेशन्स’ या विषयात डिप्लोमा झाल्यावर लगेच १९७२ मध्ये ‘लिंटास’ कंपनीमध्ये फोटोग्राफी विभागात राजाध्यक्ष कामाला लागले. त्यांचे उत्कृष्ट काम पाहून त्यांना ‘फोटोसर्व्हिस’ विभागाचे प्रमुख करण्यात आले. फोटोग्राफीच्या व्यवस्थेपासून ते फोटो प्रसिद्ध करण्यापर्यंतचे सर्व शिक्षण लिंटासमध्येच झाले. लिंटास माझ्यासाठी विद्यापीठच ठरले.

ऍलेक पद्मसी, जस्टीन हिंदुजा, इस्माईल यांच्याकडून मला भरपूर शिकायला मिळाले हेही ते सांगायचे. लिरील, मारी, रीन, सर्फ या सर्व जाहिराती करता करताच लिखाणही सुरू होते. त्यांची बहीण शोभा डे यांच्या ओळखीने ‘स्टारडस्ट’ व सोसायटीमध्ये त्यांचे लिखाण व फोटो प्रसिद्ध होऊ लागले. संपूर्ण फिल्म जगतात सर्वांना गौतमकडूनच फोटो काढून घ्यायचे असायचे. दुर्गा खोटेंपासून ते आजच्या सोनम कपूरपर्यंत सर्व नट्यांचे फोटो त्यांनी काढले आहेत. त्यावेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘इलस्ट्रेटेड विकली’चे प्रमुख प्रीतीश नंदी गौतमने एक माधुरी दीक्षितचा काढलेला फोटो घेऊन गेले. तो छापला आणि खाली लिहिले, ‘‘श्रीदेवी इज आऊट ऍण्ड माधुरी इज इन.’’ या फोटोने मोठी धूम केली होती. एकदा नूतन यांचे शूट करताना गौतमने त्यांना विचारले, ‘‘ताई, तुमचा बेस्ट अँगल कोणता?’’ प्रथमच त्यांचा फोटो काढत असल्यामुळे हा प्रश्‍न उद्भवला. त्यावर नूतनताईंचे मेकअपमॅन पंढरी जुकर म्हणाले, ‘‘अहो, काय विचारताय! त्यांचे सगळे अँगल व्यवस्थित आहेत. फोटो वाईट आले तर तुमचा दोष असेल. नंतर गौतमचेही हेच मत झाले. आज असा कोणताही सुपर कलाकार नसेल जो गौतमच्या कॅमेर्‍याला सामोरा गेला नसेल. ‘‘तुम्ही कधी प्रेमात पडलात का?’’ या प्रश्‍नावर त्यांचे उत्तर मला आवडले, ‘‘मी प्रेमात पडलो माझ्या पेंटिंगच्या, संगीताच्या, वाचनाच्या, एका पुतणीच्या आणि दोन पुतण्यांचे खूप प्रेम आहे माझ्या जीवनात.’’ माणसांचे चेहरे व विविध स्वभाव हीच त्यांच्या फोटोग्राफीची प्रेरणा होती.

नवीन चेहर्‍यांना भेटून त्यांना खूप आनंद वाटायचा. सलमान खान, माधुरी दीक्षित, जुही चावला, काजोल, आमीर, हृतिक, रणबीर यांना मी मोठे होताना पाहिले आहे, असे ते हसत सांगत. त्यांच्या ‘कॅनन मार्क-२ डी. एस’ या कॅमेर्‍याला हात लावून मी चूक केलेली. पण ती चूक करायची हिंमत फार जणांत नव्हती. डिजिटल कॅमेर्‍यावर कुणीही, कसेही फोटो काढते. पण त्याला गौतम फोटोग्राफीचा अपमान समजत. कॅमेरा व लायटिंगचे तांत्रिक ज्ञान फार महत्त्वाचे असते हे ते त्यांच्या सर्व शिष्यांना सांगत. नवशिक्यांनी डिजिटलचा वापर करावा, पण ज्ञानात भर करत राहावी. गौतमसोबत चहा पिण्याचा कार्यक्रम म्हणजे २-४ तासांहून कमी कधीच झाला नाही. कोणताही विषय असला तरी गौतमकडे त्यांची माहिती असायचीच. संगीतातल्या रागांपासून ते ऑपेरापर्यंत, वारली पेंटिंगपासून ते लुब्र म्युझियम, पॅरिसमधील मोनालीसापर्यंत, लगोरीपासून ते रग्बीपर्यंत. खरं तर गौतमने नेहमी जगण्याचा व या जगाचा अभ्यास केला. ते सांगत, ‘‘माझे फोटो म्हणजे माझे लेख आहेत. ते काहीतरी सांगतात व पाहणार्‍यांशी बोलतात. कोणालाही फोटोग्राफीचे वेध लागले की पहिली व्यक्ती विचारात येते ती गौतम राजाध्यक्ष. अतुल कसबेकर हे आजच्या पिढीतील नावाजलेले फोटोग्राफर. केमिकल इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षीच त्यांनी इंजिनीयरिंग सोडून फोटोग्राफीकडे वळायचे ठरवले. तेव्हा एमटीएनएलच्या डिरेक्टरीत असलेल्या सर्व राजाध्यक्षांना त्याने फोन लावला. शेवटी गौतमला गाठलेच. जगभर गौतमचे शिष्य पसरले आहेत. असे अनेक फोटोग्राफर आहेत जे गौतमचे फोटो पाहून शिकत राहतात. गौतम हा अनेक एकलव्यांचा द्रोणाचार्य ठरला. ४ दिवसांपूर्वी १४ सप्टेंबर २०११ रोजी हृदयविकाराने गौतमचे निधन झाले. शिष्य, मित्र व सिनेजगत कळवळून उठले. आपल्यातून एक फार मोठा कलाकार गेला, पण त्याने त्यांच्या एकलव्याच्या रूपात त्याची कला जिवंत ठेवली आहे. परीची छडी असून उपयोग नाही. ती वापरताही आली पाहिजे. गौतम अनेकांना सुंदर करून गेला. त्या छडीचे ज्ञान गौतमच्या शिष्यांनाही वापरता यावे हीच गौतमची शेवटची इच्छा होती.

योगायोग असा की शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी गौतमचा वाढदिवस होता. गौतम जिथे असाल तिथपर्यंत हा संदेश पोहचावा. ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’