हजारे यांची पंतप्रधानांवर पुन्हा तोफ

पंतप्रधानांविरुद्ध अण्णा

पंतप्रधानांविरुद्ध अण्णा

नोएडामध्ये अण्णा हजारे यांना अचानक पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह भ्रष्टाचारी असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी मुंबईत असताना याचा पुनरुच्चार केला. हा गृहस्थ प्रामाणिक असल्याचा समज ‘कोलगेट’ प्रकरणामुळे खोटा ठरला, सुमारे दोन लाख कोटींचा घाटा कोळशाच्या १५५ खाणींच्या व्यवहारामध्ये आला असून, हे सत्य जनतेसमोर उघड होण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

परळच्या केईएम रुगणालयासमोरील मैदानात अण्णा हजारे यांची राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि सशक्त लोकायुक्त समर्थन मंचच्या संयुक्त विद्यमाने जाहीर सभा झाली. हजारे यांनी त्यापूर्वी झालेल्या पत्रकार बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर तोफ डागली. हजारे यांनी इशारा दिला की, २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकींपर्यंत हा संघर्ष चालूच राहील.

कॉंग्रेसला बदनाम करण्यासाठी आम्ही आंदोलन करत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सशक्त लोकपाल असल्यास प्रथम तुरुंगात जातील. भ्रष्टाचाराचा आरोप पंधरा केंद्रिय मंत्र्यांवर असल्याकारणानेच ते हा कायदा करीत नाही, असा थेट आरोप हजारे यांनी केला आहे. हजारे म्हणाले की, लोकपाल आणले तर आम्ही कॉंग्रेससोबत राहू.

पंतप्रधान रिमोट कंट्रोलच्या खाली काम करतात. पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केला नसला तरी हे पैसे कुठेतरी मुरले आहेत. सीबीआय निःपक्षपणे या मुरलेल्या पैशांची चौकशी करु शकणार नाही. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशच हवेत, असे स्पष्ट मत हजारे यांनी व्यक्त केले.