आरंभ तोच, फ़क्त अंत वेगळा

एकदा अकबर बादशहा बिरबलाला म्हणाला, बिरबल ! काल रात्री मला मोठं मजेशीर स्वप्न पडलं. स्वप्नात मी मधाच्या हौदात पडलो होतो, तर तू चिखलाच्या हौदात पडला होतास !’

बिरबल – (आश्चर्य वाटलेसे दाखवून) खाविंद, आपल्याला आणि मला एकाच रात्री एकच स्वप्न पडावं, म्हणजे केवढा अपूर्व योग आहे हो ?

बादशहा – (खऱ्या आश्चर्यान) काय म्हणतोस बिरबल ? तुलाही हेच स्वप्न पडलं होतं ? तर मग खरोखरच नवल आहे !

बिरबल- मग सांगतो काय ? आपल्याला आणि मला पडलेल्य स्वप्नांचा आरंभ अगदी एकच; फ़क्त फ़रक पडला, तो त्यांच्या अंतात.

बादशहा – (उत्कंठेने) असं ? तर मग तुला पडलेल्या स्वप्नाचा शेवट कसा झाला ?

बिरबल – खाविंद, आपण मधाच्या हौदातून आणि मी त्या गलिच्छ चिखलानं भरलेल्या हौदातून बाहेर पडल्यावर, मी माझ्या जिभेनं चाटून खाविंदांच अंग स्वच्छ केलं, तर खाविंदानी आपल्या जिभेनं माझं अगं चाटून स्वच्छ केलं !

बिरबलाच्या या उत्तरानं कुठुन याची थट्टा करायला गेलो, असं बादशहाला होऊन गेलं.