अर्थार्जन पद्धती

घर चालवायचे तर त्यासाठी अर्थार्जन आवश्यकच असते. अर्थार्जनामागचा हेतू ‘ आवश्यकता ’ हा असला तरी ते कसे करावे, यासंबंधीची काही मार्गदर्शक सूत्रे आपल्या जीवनचिंतकांनी सांगितली आहेत. ‘ अर्थ ’ हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थापैकिएक ‘ पुरुषार्थ ’ असला तरी त्यावर धर्माचे नियंत्रण आहे. कोणाचेही शोषण नकरता अर्थार्जन व्हावे. स्पर्धा असली तरी ती निकोप असावी. प्रत्येकाने आपली क्षमता वाढवून स्पर्धेत उतरावे. दुसऱ्याचे पाय ओढून यश प्राप्त करण्याची आकांक्षा धरू नये. कष्ट व त्याचे फल या स्वरूपात अर्थ प्राप्त व्हावा. तसेच अशा धनाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांसाठी, समाजासाथीसुद्धा व्हाव. एका विचारवंताने म्हटले आहे. “ पाश्चात्त्यांची संकल्पना आहे ‘ कमायेगा वह खायेगा ’ तर भारतीय संकल्पना आहे, ‘ कमायेगा वह खिलायेगा. ”

विदेशी कंपन्यांद्वारे भारतीय उद्योग संपविण्यासाठी होणारे प्रयत्न, गायींचे दूध काढण्यासाठी यंत्रांचा उपयोग, कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठराविक वेळापेक्षा अधिक वेळ ताबडवून घेण्याची प्रवृत्ती, सिगारेट व गुटख्यांच्या पाकिटांवर दिसेल न दिसेल अशा पद्धतीने अगदी बारीक अक्षरांत असलेली ‘ आरोग्यास घातक ’ असल्याची सूचना, तर स्वदेशी उत्पादनांची निंदा या गोष्टी अनिष्ट अहेत. याचा घराशी काय संबंध ? असा विचार मनात येईल. पण थोडा विचार केल्यानंतर लक्षात येईल की, या प्रवृत्ती घरातूनच सूरू होतात व बाहेरच्या अशा या प्रवृत्तींचा परिणाम घरावर होत असतो. सुसंस्कार असतील तर या प्रवृत्तींपासून दूर राहता येते.