अश्शी दिवाळी सुरेख बाई

अश्शी दिवाळी सुरेख बाई

अश्शी दिवाळी सुरेख बाई

ओ हो..दिवाळी आली.. खरंच,अगदी मनापासून आनंद होणारा असा हा आपला लाडका सण.. हो की नाही? पण ‘दिवाळी आली..’ असं म्हणताना हल्ली मात्र काटा येतो.. अं हं..चकलीवरचा नाही बरं! :-) दिवाळी म्हटलं की पूर्वी कशी छान-छान चित्रं नाचू लागत डोळ्यांपुढे.. सुगंधी उटणे.. अभ्यंग-स्नान.. नवे कपडे.. आकाशकंदील, दिवाळीची शुभेच्छापत्रं, पणत्या, रांगोळ्या अन् त्यांचे सुंदर रंग, लाडू, चिवडा, अनारसे, चकली-शेव, शंकरपाळ्या, करंज्यांनी घमघमणारं, तेवत्या पणत्यांच्या आणि दिव्यांच्या रोषणाईनं सजलेलं आणि पै-पाहुण्यांनी गजबजलेलं सुरेख घर.. फटाके हा तर अर्थात अविभाज्य भाग असेच.. त्याचे आकर्षण कधी संपेलसं वाटत नाही..

पण आता मात्र ‘फटाके’ हा शब्द उच्चारला की धडकीच भरते.. कारण पूर्वी दिवाळी आणि सार्वजनिक सण-उत्सव इतपत मर्यादित असलेले आणि आकर्षण वाटणारे फटाके आता मात्र बाराही महिने वाजत असतात.. कोणताही आनंद हा त्यासाठी मग निमित्त-मात्र असतो.. क्रिकेटचा सामना जिंकणे, निवडणुकीतला विजय, वाढदिवस, अगदी कोणतेही सेलिब्रेशन ‘आवाज’ केल्याशिवाय साजरंच होत नाही की काय असं वाटू लागलंय.. मी जिथं राहते तिथं मागच्या बाजूस टेकडी वर आमदार-खासदार यांची स्वतःची घरे आहेत. तिथं अगदी रात्री-बेरात्री सुद्धा अचानक झोपेतून दचकवून उठवणाऱ्या त्या फटाक्यांच्या माळा संपण्याची प्रतीक्षा करावी लागते..

आनंद म्हणून फटाके वाजवणं हा वेडेपणा आहे. फटाक्याच्या रूपाने आपण वेड्यासारखे  चक्क पैसे जाळतो. पण हे आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे की, फटाक्यांच्या धुरात असतात कर्ब, नत्र, गंधक आणि स्फुरदाची ऑक्साइडस्, ज्यांच्या विषारी वायूंमुळे नाक, घसा, फुफ्फुसं, रक्त, मेंदू आणि मज्जासंस्थेवर ही दुष्परिणाम होतो. कानांना तात्पुरतं किंवा कायमचं बहिरेपणही येऊ शकतं.. आगी किती लागतात अन् कितीजण भाजतात याची तर गणतीच नाही..

आज आपण जी दिवाळी ‘साजरी’ करतो ती सर्वांच्या आरोग्याची आणि बाह्य निसर्गाची हानी करणारी आहे असं नाही वाटत का? अगदी आपण जी आकर्षक शुभेच्छा-पत्रे वापरतो ती सुद्धा निसर्गाची फार मोठी हानी करून तयार होतात.. कारण त्यासाठी लागतं उच्च दर्जाचं लाकूड आणि ते मिळवण्यासाठी दरवर्षी होते लाखो झाडांची कत्तल.. शिवाय हा कागद पांढराशुभ्र बनवताना होणारा रसायनांचा मुबलक वापर जी पुन्हा हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करतात.

तीच गोष्ट रांगोळ्यांची सुद्धा.. मुठींनी भसाभसा ओतून रांगोळी काढून तिच्यात भडक रंग भरणं हे पर्यावरणाची हानी करीत असतं हे आपल्या कुणाच्या गावीही नसतं.. ही सारी रांगोळी मातीत मिसळून वाया जाते, नदीमध्ये गाळ म्हणून साठते आणि रांगोळीतले हे रंग म्हणजे भयंकर विष असतं.. क्रोमियम, तांबं, निकेल, कोबाल्ट, लोह, इत्यादी जड धातूंची ती संयुगं असतात आणि हे सारं आपले डोळे, त्वचा, श्वसनमार्ग यांची वाट लावणारं.. आणि यातली काही सेंद्रिय रंगीत रसायनं कर्करोगजनकही  आहेत असं सिद्ध झालंय… बाप रे.. काय शॉट आहे डोक्याला असं वाटलं नं हे सारं वाचून?

पण आपण हे सारं थोडंसं बदलू शकतो की.. पैसे जाळण्यापेक्षा त्याचा विधायक उपयोग करू या, पुस्तक आणू या किंवा गरजूंना मदत म्हणून ते पैसे देऊ या.. शुभेच्छा साध्या पोस्ट-कार्ड वर किंवा फोनवर किंवा इ-शुभेच्छा देऊ या.. आकाश-कंदिलासाठी थर्माकोल टाळू या. आणि हे सारं करताना तुमची क्रिएटीविटी पणाला लागू दे की.. रांगोळी काढताना नाजूक, दोन बोटांच्या चिमटीतून ती काढू या..तिच्यात रंग भरताना झेंडू सारख्या सुंदर फुलांच्या पाकळ्यांचे भरू या.. मेणाच्या तय्यार पणत्यांपेक्षा गोड्या वा कडू तेलाच्या मर्यादित पणत्यांनी दीपोत्सव साजरा करू या..

आपणच आपलं आणि त्यायोगे सर्वांचं आरोग्य जपून पर्यावरणाची हानी टाळण्यामध्ये खारीचा वाटा उचलू या.. अगदी खूप नाही पण यातलं थोडंसं तरी पाहू या की यावेळी करून…

… कारण दिवाळी असते दिव्या-दिव्यांच्या अगणित ज्योती.. सारा अंध:कार दूर सारत नव्या आनंदात सारं जग मस्त उजळवून टाकणारी..  :-)