अस्वल आणि कोल्हा

असे सांगतात की, अस्वल मनुष्याच्या प्रेतास शिवत नाही. एके दिवशी एक अस्वल म्हणाले, ‘मनुष्यजातीसंबंधाने माझी इतकी आदरबुध्दी आहे की, मला जरी कोणी पृथ्वीचे राज्य देऊ केले, तरी मनुष्याच्या प्रेतास मी कधी धक्का लावणार नाही. ’ हे ऐकून कोल्हा त्यास म्हणतो, ‘अरे, तू म्हणतोस ते कदाचित खरे असेल, पण मनुष्याच्या प्रेताची तुला जशी दया येते, तशीच जर मनुष्याची येईल, तर तुझ्या ह्या बढाईत काही तरी अर्थ आहे, असे मी समजेन.’

तात्पर्य:- ज्या वस्तूचा उपयोग करून घेता येणे आपणास शक्य नाही, या वस्तूसंबंधाने आपण अगदी निरपेक्ष आहो, असे भासविण्याचा प्रयत्न करणे हा केवळ ढोंगीपणा होय.