औंढ किल्ला

औंढ किल्ला Aundh Fort- ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो.

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई तर पूर्वेकडिल औंढ, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर, वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एस.टी. ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.

इतिहास : इ.स. १६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : औंढचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चार-पाच टाक्या आहे. एका गुहेत पाणी आहे. खडकात खोदलेला दरवाजा आहे. समोरच पट्टा किल्ला,बितनगड, अलंग, मदन आणि कुलंग कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा : औंढा किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

निनावी मार्गे : मुंबई मार्गे इगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी सात वाजता भगूर कडे जाणारी एस.टी. पकडून साधारणातः दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर साधारण नाक्या पासून ४५ मिनिटांत आपण निनावी गावात पोहचतो. निनावी गावातुन औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिली वाट गावातून समोरच दिसणाऱ्या उभ्या कड्याच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुसऱ्या हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. यावाटेने किल्ल्याचे पहिले पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढा किल्ला ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर कडा उजवीकडे ठेवून पुढे जावे. वर थोडे प्रस्तरारोहण केल्यावर गडमाथा गाठता येतो.

पट्टा किल्ला मार्गे : अनेक जण औंढ-पट्टा-बितनगड असा ट्रेक सुद्धा करतात. येथून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पायऱ्या असणाऱ्या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवाझेंडा फडकतांना दिसतो. येथून पुढे जाणारी वाट थेट पट्टा किल्ल्यावर जाते.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. औंढावाडीत राहता येते.

जेवणाची सोय : नाही.

पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास निनावी मार्गे आणि २ तास पट्टा किल्लामार्गे

सूचना : पावसाळ्यात अतिकठिण.