Author Archives: विराज काटदरे

स्त्रीभ्रूणहत्या आता खुनाचा गुन्हा

स्त्रीभ्रूणहत्या आता खुनाचा गुन्हा

स्त्रीभ्रूणहत्या आता खुनाचा गुन्हा

विधानसभेत स्त्रीभ्रूणहत्या घडवून आणणाऱ्या अमानवी प्रवृत्ती विरोधात आज वादळी चर्चा झाली. स्त्रीभ्रूणहत्येने महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. स्त्रीभ्रूणहत्या हा एक गुन्हा ठरावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बिधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. आव्हाड यांची सूचना आरोग्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी यानी मान्य केली. याबद्दल ते केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी स्त्रीभ्रूणहत्येचा ज्वलंत विषय उघड करून सभागृहाचे लक्ष वेधले. अ‍ॅड. ढिकले यांनी माहिती दिली की, राज्यात बहुतांश शहरात अवैधरित्या गर्भलिंगतपासणी केंद्रे सुरु आहेत. श्रीमती पट्टेवार या महिलेचा गर्भपात परळी येथील डॉ. मुंडे यांनी केल्यानंतर तीचा मृत्यू झाला. अवैधरित्या गर्भलिंगतपासणी डॉ. सानप यांच्या रुग्णालयातही सुरु होती. मात्र, पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखवले नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील शल्यचिकित्सकांनी ३३ नवीन गर्भपात केंद्रांना मान्यता दिली.

आमदार ढिकले यांनी सरकारला धारेवर धरत सांगितले की, आजही १२९ सोनोग्राफी केंद्रे याच जिल्ह्यात सुरु आहेत. स्त्रीभ्रूणहत्या हे मानवी संस्कृतीवरचे संकट आहे आणि स्त्रीभ्रूणहत्येचे पाप सर्रासपणे घडत आहेत. सध्याचा कायदा कमकुवत असल्यामुळे हे धाडस करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा, असे आमदार जितेंद्र म्हणाले.

आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सभागृहात घोषणा केली की, ‘केंद्राच्या कायदानुसार भ्रूणहत्येच्या गुन्ह्यासाठी कलम ३०४ चा गुन्हा नोंद करण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल की भ्रूणहत्या हा खून असल्याने हा गुन्हा कलम ३०२ खाली आणावा. राज्य सरकार केंद्राकडे भारतीय दंड सहिंता कायद्यात अशा प्रकारचा बदल करण्याची विनंती तातडीने करण्यात येईल.’