बैल आणि लाकूड

काही बैल एक मोठे इमारतीचे लाकूड रानातून ओढून नेत होते. बैलांचा तो कृतघ्नपणा पाहून त्या लाकडास मोठा राग आला. ते म्हणाले, ‘अरे, मी जेव्हा रानात उभे होते, तेव्हा माझा पाला मी तुम्हास खाऊ घातला होता आणि माझ्या छायेत बसून तुम्ही सुखाने झोप घेत होता. पण ते सगळे विसरून मला या दगडमातीतून तुम्ही आता ओढून नेत आहात, तेव्हा तुमच्या या वर्तनास काय म्हणावे ?‘ बैलांनी उत्तर केले, ‘आम्ही हे काम खुषीने करीत नाही; आमच्याकडून ते जबरदस्तीने करून घेतले जात आहे. हे जर लक्षात घेशील तर तू आम्हांस खचित दोष देणार नाहीस.’

तात्पर्य:- एखादयाच्या इच्छेविरूद्ध त्याजकडून बळजबरीने जे काम करून घेतले जाते, त्याबद्दलचा दोष त्याला देणे प्रशस्त नाही.