कलावंतांसाठी आता बालगंधर्व शिष्यवृत्ती

बालगंधर्व

बालगंधर्व

महापौर वैशाली बनकर यांनी सोमवारी माहिती दिली की, नव्या पिढीतील जी कलावंत रंगभूमीवर उल्लेखनीय काम करतात किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना यापुढे ‘बालगंधर्व शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्त दिवा प्रतिष्ठान, लावणी-नाट्य निर्माता व्यवस्थापक संघ आणि म्युझिक असोसिएशनतर्फे एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व याचे उद्घाटन बनकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपमहापौर दीपक मानकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, एकपात्री कलाकार दीपक देशपांडे, विजय पटवर्धन, चंद्रशेखर महामुनी, निर्माते शिरीष कुलकर्णी, ‘बालगंधर्व’चे व्यवस्थापक अमर परदेशी आदी उपस्थित होते.

“दर वर्षी ज्येष्ठ कलावंतास बालगंधर्वांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. नव्या पिढीतील कलावंतांना यंदापासून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सर्वांना विचारात घेऊन त्याची रुपरेषा ठरवली आहे,” असे बनकर म्हणाल्या. मानकर म्हणाले, “बालगंधर्व रंगमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी रसिकांचे प्रयत्न अपेक्षित आहेत.” दरम्यान कलावंतांनी, “हास्यकल्लोळ’, ‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘बालगंधर्व आयडॉल स्पर्धा’ असे विविध कार्यक्रम सादर करुन रसिकांची मने जिंकली.