बटाट्याचे भुजणे

साहित्य :

  • ३ मध्यम बटाटे
  • ४ मध्यम कांदे
  • २ मोठे चमचे तेल
  • पाऊण चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • ४ लसूण पाकळ्या किंवा अर्धा चमचा भाजून कुटलेली जिरेपूड
  • एक‍अष्टमांश हिंग
  • २ चमचे कोथिंबीर
  • अर्धा वाटी ओले खोबरे (असल्यास)
  • चवीनुसार मीठ

कृती :

बटाटे दुवून सोलावे. त्यांच्या गोल ३ मि.मी. जाडीच्या काचऱ्या चिराव्या. कांदे सोलून उभे पातळ चिरावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात कांदे घालावे. त्यात तेल, तिखट, मीठ, हळद, हिंग घालावा. हलक्या हाताने एकत्र मिसळावे. कांद्याच्या पाकळ्या सुट्या होऊन मसाला सारखा मिसळला की लसूणपाकळी जरा ठेचून घालावी. लसूण न खाणारांनी जिरेपूड घालावी. त्यात बटाट्याच्या काचऱ्या घालाव्या. अर्धी वाटी पाणी घालून भाजी अलगद ढवळावी व पातेली चुलीवर ठेवावी. वर पाण्याचे झाकण ठेवावे. आंच मंद असावी. कांदा पूर्ण शिजला पाहिजे. अधूनमधून ढवळावे पण बटाट्याच्या काचऱ्या मोडू नयेत. भाजी शिजली की दुसऱ्या वाढायच्या भांड्यात काढावी. वरून खोबरे-कोथिंबीर घालावी.

आवडीनुसार अर्धी वाटी मटारदाणे ह्या भाजीत सुरुवातीलाच घालून भाजी करता येते. ही भाजी ब्रेड, पोळी, पुरी किंवा भात याबरोबर चांगली लागते.