बेसन पोळ्या

साहित्य :

  • ३ वाट्या बेसनपीठ
  • ३ वाट्या साखर
  • वेलदोड्याची बारीक पूड
  • २ वाट्या कणीक
  • १ वाटी मैदा
  • १ वाटी तांदळाचे पीठ
  • पाव किलो तूप

कृती :

३ वाट्या बेसन तुपावर भाजावे गुलाबी भाजल्यावर त्यात गरम पाणी घालावे. (बेसन रव्यासारखे जास्त फुगत नाही.) पाणी बेताने घालावे. नंतर त्यात साखर घालावी व झाकण ठेवून दोन, तीन वाफा येऊ द्याव्या. त्यानंतर त्यात वेलची पावडर घालून चांगले हलवून खाली उतरवून ठेवावे. अशा रीतीने बेसनाचा शिरा करावा. कणीक व मैदा घेऊन त्यात थोडे मीठ व मोहन घालून नेहमीच्या कणकीपेक्षा थोडी सैल कणीक भिजवावी. शिरा गार झाल्यावर पोळ्या कराव्यात. पुरणपोळीप्रमाणे कणकेची पारी करून त्यात बेसनाचे पुरण घालून अलगद तांदळाच्या पिठीवर पोळ्या लाटव्यात. आवडत असल्यास तव्यावर तूप सोडून भाजावी. खमंग लागते.