भालचंद्र खेर काळाच्या पडद्याआड

भालचंद्र दत्तात्रय खेर

भालचंद्र दत्तात्रय खेर

गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन झाले. खेर यांनी चरित्रात्मक वाङ्मयप्रकार मराठीत रुजविले आहे आणि तब्बल शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
खेर गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते आणि गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगर तालुक्यातील कर्जत येथे खेर यांचा जन्म झाला होता. त्यांनी कला शाखेतील पदवी घेतली आणि त्यानंतर वकीलीचे शिक्षणही त्यांनी घेतले. ‘नादलहरी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी पदर्शित झाला. त्यानंतर सातत्याने त्यांनी सहा दशकाहून अधिक काळ आपले लेखन चालू ठेवले. त्याच वेळी त्यांनी पत्रकारितेलाही सुरुवात केली. सहसंपादक म्हणून वीस वर्षे त्यांनी ‘केसरी’ मध्ये कार्य केले, तर दहा वर्षे त्यांनी ‘सह्याद्री’चे संपादकपद भूषविले. ‘समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंड प्रकल्पाचेही त्यांनी संपादन केले.

‘अमृतपुत्र’, ‘आनंदभवन’, ‘प्रबुद्ध’, ‘क्रांतिफुले’, ‘समर सौदामिनी’, ‘चाणक्य’, ‘कल्पवृक्ष,’ ‘हिरोशिमा’, ‘दिग्विजय’, ‘सेतूबंधन’, ‘यज्ञ’, ‘सारथी सर्वांचा’, ‘हसरे दुःख’, ही त्यांची विषेश पुस्तके गाजली. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी बालगंधर्वांवरील चरित्रग्रंथ ‘गंधर्वगाथा’ पूर्ण केला होता.
राज्य सरकारचा ह. ना. आपटे पुरस्कार, साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार, शिवाजी सावंत स्मृती मृत्यंजय पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. पुणे महापालिकेने नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील संतोष हॉल येथील चौकाचे साहित्यभूषण भा. द. खेर असे नामकरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.