बोकड आणि बैल

एक बोकड फार वात्रट आणि खोडकर होता, तो, नांगरास जुंपलेल्या एका बैलास म्हणाला, ‘अरे ! तू किती गरीब आणि दुर्दैवी आहेस ! आपल्या धन्यासाठी, हे असले जड जू मानेवर घेऊन सगळा दिवस शेत नांगरीत राहण्यात तुला काही लाज वाटत नाही काय ? मला तर असे वाटते की, या लोकांनी गुलामगिरी करण्यासाठीच तुझा जन्म असावा; कारण तसे नसते तर असले हलकटणाचे काम तू कधीही केले नसतेस. माझी स्थिती किती चांगली आहे, पहा बरे. माझ्या मनास वाटेल तिकडे मी हिंडतो; कधी वृक्षाच्या थंड छायेत झोपा घेत पडतो, कधी उन्हात जाऊन बसतो; आणि तहान लागली असता ओढयावर जाऊन त्यातले पाणी पितो.’ ही सगळी बडबड तो बैल मुकाटयाने ऐकत होता. त्याने एका शब्दानेही बोकडास प्रत्युत्तर केले नाही. संध्याकाळी शेतातले काम संपल्यावर तो बैल आपल्या घरी चालला असता, त्याने त्या बोकडास काही लोक बळी देण्यासाठी घेऊन जात आहेत, असे पाहिले, त्या लोकांनी त्याच्या डोक्यावर तेल आणि शेंदूर व गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या. ती त्या बोकडाची दशा पाहून बैलास फार वाईट वाटले, परंतु न्याचे सकाळचे भाषण तो विसरला नव्हता. तो त्या बोकडाजवळ गेला आणि हळूच म्हणाला, ‘अरे ! आता सांग बरे, चांगली स्थिती कोणाची तुझी की माझी ?’

तात्पर्य:- दुसऱ्याची विपत्ति पाहून त्याचा उपहास करणारा मनुष्य स्वतः विपत्तीत पडला म्हणजे तो सगळ्यांच्याच उपहासास पात्र होतो.