चाफा बोलेना

चांफा बोलेना, चांफा चालेना
चांफा खंत करी, काहीं केल्या फुलेना ॥धृ॥
गेले आंब्याच्या वनीं
म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून ॥१॥

गेल केतकीच्या वनीं
गंध दरवळला वनीं
नागासवे गळालें देहभान ॥२॥

चल ये रे ये रे गड्या
नाचूं उडूं घालू फुगड्या
खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌ ॥३॥

हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणें करु आपण दोघेंजण ॥४॥

जन विषयाचे किडे
यांची धांव बाह्यकडे
आपण करुं शुद्ध रसपान ॥५॥

चाफां फुली आला फुलून
तेजीं दिशा गेल्या आटुन
कोण मी – चाफा ? कोठें दोघें जण ? ॥६॥