चिकू आईस्क्रीम

साहित्य :

  • १ लिटर साईसकट दूध
  • १ मोठा चमचा (व्हॅनिला) कस्टर्ड पावडर
  • ४ मोठे किंवा ६ लहान चिकू
  • दीड वाटी साखर
  • पाव चमचा केशर (चुरलेले)

कृती :

चिकू आईस्क्रीम

चिकू आईस्क्रीम

एखाद्या लहान पातेलीत कस्टर्ड पावडार व अर्धा कप थंड दूध मिसळावे. गुळगुळीत व एकजीव करावे. त्यात आणखी अर्धा कप दूध मिसळून गॅसवर ठेवावे. सतत ढवळत राहावे म्हणजे गुढळ्या होणार नाहीत. घट्टसर होऊ लागले की त्यात पाऊण वाटी साखर घालावी. साखर विरघळली की मिश्रण चुलीवरून उतरवावे व गार होऊ द्यावे.दुसऱ्या रुंद भांड्यात उरलेले दूध तापवावे. प्रखर आंचेवर १५ मिनिटे आटवावे. त्यात उरलेली पाऊण वाटी साखर घालावी व पुन्हा ३-४ मिनिटे ढवळावे. खाली उतरवावे. केशर जरा गरम करून खलावे व या दुधात मिसळावे.चिकू सोलून बारीक चिरावेत. बिया व साली काढून गर मिक्सरमध्ये घालावे. एकजीव करून गार झालेल्या दुधात घालावा. कस्टर्डचे मिश्रण त्यात घालावे. एकत्र घुसळावे हे मिश्रण थोडेथोडे घालून मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. किंवा इलेक्ट्रिक रवी असल्यास उपयोग करावा व मिश्रण खूप घुसळावे. आईस्क्रिमचा ओला ट्रे किंवा भांडे घेऊन त्यात हे मिश्रण ओतावे.

बर्फाच्या कप्प्यात ठेवावे. जरा दाट झाले की बाहेर काढून पुन्हा घुसळावे किंवा काट्याने फेसावे. पुन्हा ट्रेमध्ये ओतून फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यात ठेवावे. हे आईस्क्रीम गुळगुळीत व्हायला हवे. खायला देताना वरून तोडीशी घोटलेली साय किंवा कुस्करलेला खवा किंचित भुरभुरवा. गोड बुंदी किंवा चमचाभर शेवयांची खीर वरून घातली तरी चांगली लागते व चांगली दिसते.