चिलट आणि सिंह

एक चिलट फार उन्मत्त झाले होते, त्याने एका सिंहावर हल्ला करून त्याच्या कानास, नाकास आणि डोळ्यास दंश केल्यामुळे त्या दुःखाने तो सिंह जमिनीवर पडून गडबडा लोळू लागला. त्याने त्या चिलटास धरून मारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ गेला. उलट ते चिलटच सिंहास पुनः पुनः दंश करू लागले. शेवटी, त्या वेदनेने सिंह इतका व्याकुळ झाला की, तो अगदी निचेष्टित होऊन जमिनीवर पडला. आपण सिंहाची चांगली खोड मोडली या विचाराने ते चिलट गुणगुण करीत उडया मारीत असता, जवळच, एक कोळ्याचे जाळे होते त्यात सापडले. त्या जाळ्यातून सुटून जाण्यासाठी त्याने पुष्कळ धडपड केली, पण त्यामुळे ते अधिक गुरफटून गेले आणि शेवटी कोळ्याच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य:- सुखदुःख हे सर्वांसच आहे. अगदी क्षुल्लक प्राण्यापासून देखील प्रसंगी पुष्कळ त्रास होण्याचा संभव असतो.