चिंचेचे गोड सार

साहित्य :

 • लिंबाएवढी चिंच
 • ३ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • एक‍अष्टमांश चमचा हिंगपूड
 • एक‍अष्टमांश चमचा हळद
 • १ चमचा तिखट
 • १ चमचा मीठ(किंवा जास्त लागेल)
 • ३ चमचे गूळ
 • २ चमचे ओले खोबरे
 • २ चमचे कोथिंबीर

कृती :

चिंच अर्धी वाटी पाण्यात तासभर भिजत घालावी. त्यात आणखी वाटीभर गरम पाणी घालून कुस्करून घ्यावी. फडक्यावर किंवा चाळणीवर गाळून घ्यावे. त्यात आणखी दीड वाटी गरम पाणी घालून चुलीवर ठेवावे. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालावी व चिंचपाण्यावर फोडणी ओतावी. तिखट व मीठ घालून पाचसात मिनिटे चांगले उकळू द्यावे. चिंचेचा कच्चट वास गेला की गूळ घालावा. मंद आंचेवर दोन मिनिटे उकळले की खोबरे व कोथिंबीर घालून उतरावावे. हे सार, मुगाची खडी डाळ व भात याबरोबर स्वादिष्ट लागते.

शिवाय प्रकृतिसाठिही चांगले आहे.