चोराच्या मनात कापूस

एका कापसाच्या वखारीत काम करणाऱ्या पाच नोकरांपैकी एकानं कापसाची एक भलीमोठी गासडी चोरली कुणाला तरी विकली. मालकाच्या ते लक्षात येताच, त्याने पाचही नोकरांना दम देऊन पाहिला, पण त्यांच्यापैकी कुणीच चोरी केल्याचे कबूल करीना. अखेर मालकाने त्या पाचही नोकरांना बिरबलाकडे नेले, व झालेल्या चोरीचे वृत्त त्याच्या कानी घातले.

बिरबलानं त्या पाचही नोकरांना एका रांगेत उभे केलं, मग त्यांच्यावरुन एकवार नजर फ़िरवून, खो खो हसत तो मालकाला खोटचं म्हणाला, ‘कापसाची गासडी पळवली खरी, पण ती डोक्यावरुन पळवून नेताना तिच्यातला कापूस आपल्या मुंडाशात अडकून रहिला, तो झटकून टाकायला चोर विसरलाच की हो ?’

बिरबल असं म्हणताच, ‘ज्या नोकरानं ती गासडी चोरुन नेली होती, त्यानं आपलं मुंडासं चाचपून पाहिलं. त्याबरोबर, ‘हाच तो कापसाची गासडी चोरणारा नोकर’ असा निर्णय बिरबलानं दिला, आणि तो अगदी खरा ठरला.