रंगीबेरंगी सिताफळांची दुनिया

हिरव्या, फिक्कट पांढऱ्या रंगाच्या गोलाकार आणि लंबगोळ्या सिताफळांचा आपला संपर्क नेहमीचाच! सीताफळावरील खवल्यामुळे त्याची झाडावरची पक्वता सिद्ध होते. खवले पिवळे होईपर्यंत सिताफळाचा पाड लागला की नाही हे ओळखता येत नाही. पावसाळ्याच्या मध्यापासून हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तोंडची चव भागवणारे रसाळ, गोड गराचे सीताफळ पौराणिक काळापासून त्याच वर्णनाचे. पण, नेहमीच्या आकारापेक्षा अवाढव्य अगदी दोन-अडीच किलो वजनाचे,वरून निळसर, लालभडक आणि आतून गुलाबी, नेहमीपेक्षा अधिक गराचे मिठासदार सीताफळ तुम्ही कधी पाहिले आहे का? विश्वास बसत नसलेल्या आश्चर्यकारक सीताफळाने जन्म घेतलाय! बार्शी तालुक्यातील गोरमाळेच्या माळावर अवतरलेल्या सीताफळाचे आपला आकार, रंग-रुप, गुणधर्म आणि मूळ स्वभाव देखील बदलला आहे. नेहमीपेक्षा वेगळे, हंगामापेक्षा उशीरा येणाऱ्या या सीताफळाने अंगभूत चवसुद्धा इतकी मिठासदार केली की, खाणाऱ्यांचा विश्वासही बसणार नाही. विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या येणाऱ्या या दूर्लक्षित फळावर अल्पशिक्षित असलेल्या एका शेतकऱ्याने हे अफलातून ‘संस्कार’ केले असून त्याचे निरीक्षण म्हणजे २१ व्या शतकातील नव्या बदलांमध्ये टाकलेले यशस्वी पाऊल आहे.

रंगीबेरंगी सिताफळांची दुनिया

रंगीबेरंगी सिताफळांची दुनिया

सीताफळांचा इतिहास पुराणीक असल्याच्या दंतकथा आहेत; मात्र त्याचा दाखल कुठल्याच पुराणात मिळत नाही. सीताफळाबद्दल आयुर्वेदातील महत्त्व सांगणारे अनेक वैद्य आहेत, सगळ्यांपासून दूर्लक्षीत झालेले फळ आहे आणि बाजाराच्या कोपऱ्यात त्याच्या विक्रीची जागा सुद्धा आहे. डोंगरदऱ्या, विहिरीचा उपसा, शेताच्या बांधावर आपले अस्तित्व टिकवणारे सीताफळ शेतकऱ्यांनी दुर्लक्षित करूनहीतग धरून आहे. उन्हाळ्यात काड्या आणि पावसाळ्यात हिरवा शालू पांघरून निसर्गाच्या आधारावर तरलेले सीताफळ दुर्लक्ष करण्याइतके का वाईट फळ आहे? फळधारणा झाल्यावरच त्याची शेतकऱ्यांना आठवण यावी का? यासह अनेक प्रश्नला दुर्लक्ष करणाया शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण होतात. सीताफळासाठी आपल्याकडे अनुकूल वातावरणही आहे. अल्पपाण्यावर अग्दी माळरानावर येणाऱ्या फळाला बांधावरून शेतापर्यंत आणण्याचे धाडस फारसे कुणी करीत नाही. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील नवनाथ कसपटे यांनी मात्र गेल्या ३० वर्षात इत्यंभूत अभ्यास करून त्यांनी सीताफळाची पाठ सोडली नाही. त्यांनी सुरवातीला ५ द्राक्षबागेतही सीताफळाची लागवड केली. नैसर्गिकरित्या बांधावर, नदीकाठी उगवणाऱ्या, वाढणाऱ्या सीताफळाला त्यांनी स्वतःच्या २२ एकर क्षेत्रात जागा उपलब्ध करून दिली आहे. ३० वर्षात इत्यंभूत अभ्यास करून त्यांनी सीताफळाचे मूळचे गुणधर्म देखील बदलून टाकले आहेत. त्यांच्याकडे २२ एकर सीताफळ आणि ३ एकर सीताफळाची रोपवाटिका आहे. या बागेत एरव्ही सगळीकडे निसर्गतः आढळणाऱ्या बाळानगरीसह वैशिष्ट्यपूर्ण चांदसिली, अ‍ॅटोमिया, फिंगर, प्रिंटस, अ‍ॅनोना २, अ‍ॅनोना ७, गोल्डन बाळनगरी, अर्कासहान, लक्ष्मण फळ, चेरीमोया, आईसजेली, आयसीकल, लाल सीताफळ, हैद्राबा सिलेक्शन, अ‍ॅनोना मेरीकाटा, या १५ जातीसह स्वतः विकसित केलेल्या एनएमके-१, एनएमके-२, एनएमके-३, या जातीची सीताफळे आहेत. भरघोस फळे, मिठासदार गर अणी चटकदर चवीची ही सीताफळे एकाच बागेत न्याहळताना तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. यातील काही जातीच्या सीताफळांचा रंग वरून गडद निळा, गडद लालसर असून आतील गुलाबी गर अत्यंत चविष्ट, चवदार आहे. बाजारातील अन्य सीताफळे संपल्यानंतर या सिताफळांचा हंगाम सुरू होतो. आपल्याकडे ३० पेक्षा अधिक वाणांची सीताफळे असावीत यासाठी आग्रही असलेल्या कसपटे यांनी सीताफळाच्या जातीचे संग्रहालय उभारले आहे. ३ एकरामध्ये असलेल्या या संग्रहालयात दररोज नवनवीन प्रयोग आणि संशोधन केलेल जाते. या संशोधनातून वॉशिंग्टन, पिंकमहमथ, वॉशिंग्टन जेम, चेरीमोय, वॉशिंग्टन ५७-३, टी.पी.-७, ए.बी., बी.ए., ए.डब्ल्यू. आदी वाण प्रयोगावस्थेत आहेत. नवनाथ कसपटेसह ना. धो. महानोर. वि.ग. राऊळ, शाम गट्टानी, विजय कोलते, राजेंद्र अहिरे पाटील, रविंद्र कोटोले, राजभाऊ देशमुख यांनी सीताफळामध्ये काम करून दुर्लक्षित फळाला काळ्याभारी जमिनीत पोहेचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच दहावर्षापूर्वी नगण्य असलेल्या सिताफळाने महाराष्ट्रात ३० हजार हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. शेतकऱ्यांची मानसिकता हळूहळू बदलत असली तरी सीताफळ हे हमखास उत्पन्न देणारे फ्ळ असून अल्यल्प पाण्यावर माळरानावरसुद्ध मुबलक प्रमाणात उत्पन्न देते. काळ्या-भाऱ्या जमीनीत योग्य देखभाल करून सीताफळ शेती केल्यास एकरी अडीच ते ३ लाख रुपयांचे वार्षिक उपन्न मिळू शकते. बागेत आंतरपिके घेतल्यास त्याचा लाभ सिताफळांनाही होतो. कुजलेल्या शेणखताची मात्रासीताफळाला अधिक लागू पडते, असे श्री कसपटे सांगतात. सीताफळ शेती म्हणजे दौलतीचा मार्ग असल्याचे प्रशस्तीपत्र देणाऱ्या कृषी विद्यापीठाने राज्यात दहावर्षापूर्वी संशोधन केंद्र सुरू केली असली तरी ती मोजकीच आहेत. कसपटे यांनी गेल्या तीस वर्षापासून सीताफळात केलेले काम म्हणजे शासनाच्या संशोधन केंद्राहून कितीतरी अफाट आणि अचाट आहे. ११ वी उत्तीर्ण असलेला हा शेतकरी पूत्र स्वतःच्या निरिक्षणातून वैविध्यपूर्ण सीताफळाला जन्म देतो काय, नि त्याच्या या वस्तूला ग्राहक डोक्यावर घेतात काय. मुळात सीताफळाबद्दल असलेला नकारात्मक दृष्टीकोण बदलण्यासाठी जगाला अजून किती काळ लागेल माहीत नाही, पण तोपर्यंत मुळ सीताफळाचे महत्त्व उमगलेल्या जगासमोर कसपटे सारख्या सामान्य शेतकऱ्याने लावलेला शोध न समजण्या पलिकडचा असेल, कसपटे यांच्या बागेतील सीताफळाने राज्यातील प्रमुख शहराच्या बाजारपेठा केंव्हाच काबीज केल्या आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या एन.एम.के.१. एन.एम.के.२ आणि एन.एम.के.३ या जातीच्या वैशिष्ट्य पूर्ण सीताफळांनी त्यांना खराकुरा दौलतीचा मार्ग दाखविला आहे. दोन ते अडीच किलो वजनाच्या या सीताफळाने मुंबईच्या बाजारपेठेत गतवर्षी भावाचा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे नैसर्गिक रित्या येणाऱ्या सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर त्यांच्या बागेतील सुरू होणारा हंगाम त्यांच्या अर्थप्राप्तीला बळकटी देणारा आहे. त्यांनी संशोधित केलेल्या सीताफळाचे विश्लेषण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (राहूरी) तसेच सौ. केशरबाई क्षीरसागर कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी (बीड) यांनी केले आहे. म्हणूनच त्यांनी माळरानापासून बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच सीताफळ शेतीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या विविध भागात त्यांनी अनेकवेळा व्याख्याने दिली. त्यांच्या पुढाकारातून राज्यात सीताफळ परिषदा घेण्यात आल्या. किंबहुना सीताफळाचा बादशहा ठरलेले कसपटे अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या वैविध्यपूर्ण सीताफळ शेतीला अनेक संशोधकांनी भेटी दिल्या आहेत. गोरमाळेच्या माळावर फुललेला सीताफळांचा मळा विलोभनीय असाच आहे.

आयुर्वेदिक फळ सीताफळ
मधूर व थंड तसेच पित्तनाशक बलवर्धक असलेल्या सीताफळाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे. सीताफळ सेवनाने थकवा अशक्तपणा दूर होतो. उत्साहवर्धक, भूकवर्धक आणि स्मरणशक्ती वाढविणाऱ्या सीताफळाचा अतिसार व मुरड्यासाठी औषध म्हणून वापर केला जातो. सीताफळ तृषाशामक तसेच वातशामकही आहे. मानसिक संतुलन हरवलेल्या व्यक्तींना तीव्र रेचक म्हणून सिताफळाची मात्रा दिली जाते. सीताफळाची पाने जखमेवर बांधल्यास त्वरीत बरीच होतात. तसेच जनावरांच्या जखमावर देखीळ या पानांचा शेतकरी वापर करतात. सीताफळाच्या खोडाला वाळवी लागत नाही, कारण पानात आणि मुळात विषारी द्रव्य असतात. सीताफळ जेवणानंतर खावे ते नवजीवन देणारे फळ आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. छ्त्तीसगड या राज्यातील आदिवासी, वैद्य सीताफळे आणि त्याची पान औषधासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात.