धीरूभाई मनोज तिरोडकर

मनोज तीरोडकर
मनोज तीरोडकर

मनोज तिरोडकर लहान वयातच एक दंतकथा बनले आहेत. मराठी माणूस निर्बुद्ध, बिनकामाचा ही बदनामी करणऱ्यांना तिरोडकरांनी चपराकच मारली. ५०,००० कोटींच्या ‘जीपीएल’ कंपनीने स्वतःच्या टॉवर्सखाली अंबानीची कंपनी घेतली. मनोज तिरोडकर हा नव्या युगातला बेधडक धीरूभाईच आहे.

मनोज तिरोडकर कोण? असे आता कोणी विचारणार नाही. जागतिक उद्योग क्षेत्रात त्यांणा स्वकष्टाने मराठी पताका फडकावली आहे. कोणताही गाजावाजा न करता, सत्ताधाऱ्यांची हाजी हाजी न करता मनोज तिरोडकरांनी त्यांची ‘जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ जगातील पहिल्या क्रमांकाची मोबाईल टॉवर्स पुरविणारी कंपनी केली. ५०,००० कोटी रुपयांचा हा व्यवहार त्यांना अंबानींच्या रिलायन्सशी पूर्ण केला व रिलायन्सची टेलिकॉम कंपनी तिरोडकरांच्या ‘जीटीएल’ मध्ये विलीन झाली. आतापर्यंत आपल्याला एकच माहीत होते ते म्हणजे अंबानी छोटे असो किंवा मोठे, त्यांची कंपनी इतरांना गिळते. इकडे आक्रीत झाले. तिरोडकरांच्या ‘टॉवर्स’ खाली अंबानींची कंपनी उभी आहे. एका उद्योजकाचे हे कसब आहे, शौर्य आहे आणि धाडस आहे. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या धाडसी तरुणांनाच अशी जबरदस्त गुरुडझेप घेता येते. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या तिरोडकरांनी ही गुरुडझेप घेतली व संपूर्ण जगाने त्यांना ‘सॅल्यूट’ मारला.

शून्यातून साम्राज्य!
धीरूभाई अंबानी व त्यांचे औद्योगिक साम्राज्य हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला. धीरूभाईंनी शून्यातून त्यांचे औद्योगिक साम्राज्य उभे केले. हे साम्राज्य देशाच्या राजकीय सत्तेलाही भारी पडले. धीरूभाई आज नाहीत. त्यांची मुले अनिल व मुकेश हे आता स्वतंत्रपणे अंबानींचे साम्राज्य सांभाळतात. त्या प्रत्येकाचे साम्राज्य आज एक लाख हजार कोटींचे आहे. पण ते वडिलांकडून मिळालेले राज्य आहे. मनोज तिरोडकरांचे साम्राज्य साधारण ७५,००० कोटींचे आहे व ते स्वतःच्या अक्कलहुशारी व मेहनतीने उभे केले आहे हा फरक आहे. त्यामुळे तिरोडकरांची तुलना आता फक्त धीरूभाईंशीच होऊ शकते. “ आपली स्वप्नं विशाल असली पाहिजेत आणि महत्त्वाकांक्षा अधिक भव्य असली पाहिजे. आपली बांधिलकी अधिक दृढ असली पाहिजे आणि आपले प्रयास अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. रिलायन्ससाठी माझे हे स्वप्न आहे, खरं म्हणजे हिंदुस्थानसाठीच माझं हे स्वप्न आहे,” असे धीरूभाई एकदा म्हणाले होते. मनोज तिरोडकरांनी धीरूभाईचा हा मंत्र तंतोतंत अमलात आणला. त्यांनी पराजय स्वीकारला नाही. प्रतिकूल परिस्थितीला आव्हान दिले व यशस्वी झाले!

काय शिकाल?
मनोज तिरोडकरांचा जन्म ५ ऑक्टोबर १९६४ चा. वयाची पन्नाशीही त्यांनी अद्यापि पार केली नाही. शिक्षणात त्यांनी फार प्रगती केली नाही. इतर उद्योगपतींच्या मुलांप्रमाणे एखाद्या आंतरराष्ट्रीय बिझनेस स्कूलमधून ‘मास्टर’ डिग्री घेऊन हिंदुस्थानात परतले नाहीत. वडिलांच्या शिपिंग एजन्सीच्या व्यवसायातही तिरोडकर रमले नाहीत. वयाच्या फक्त २१ व्या वर्षीच त्यांनी ‘ग्लोबल ग्रुप ऑफ कंपनी’ची स्थापना केली. जीटीएलची स्थापना करून तिरोडकरांनी उद्योग क्षेत्रात दमदार पदार्पण केले. तेव्हा १९८७ साली उद्योग क्षेत्रातले हे बाल शिवाजी फक्त २३ वर्षांचे होते. हिंदुस्थानातील सर्वात मोठी नेटवर्क सर्व्हिस त्यांनी सुरू केली. टेलिकॉम क्षेत्रात त्यांनी नवी क्रांती केली. ३५ देशांत त्यांनी स्वतःच्या कंपनीचे जाळे निर्माण केले. ‘ मोबाईल’ची लाट टेलिकॉम क्षेत्रात आली. तेव्हा तिरोडकरांनी नवे क्षेत्र हेरले. मोबाईल कंपन्यासाठी ‘टॉवर्स’ उभे करणे, त्यासाठी जागा मिळविणे, राखणे, त्यांची सुरक्षा करणे हे जिकिरीचे काम ठरले. तिरोडकरांनी असे ‘टॉवर्स’ निर्माण करणाऱ्या क्षेत्रात पाय रोवले. २००४ सालापासून आजपर्यंत जगभरात त्यांनी ८०,००० हून जास्त टॉवर्स उभे केले व त्यांच्या टॉवर्सच्या साम्राज्यापुढे जगभरातील सर्व बड्या टेलिकॉम कंपन्या खुज्या ठरल्या. हे ‘टॉवर्स’चे साम्राज्य तिरोडकरांना अंबानीच्या बरोबरीने उद्योग क्षेत्रात शिखरावर घेऊन गेले.

शेअर चमकला!
टेलिकॉम क्षेत्रात मनोज तिरोडकरांच्या कंपन्यांनी मारलेली धडक जबरदस्त आहे. शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांचा ‘शेअर’ चमकत असतो. ‘टेलिकॉम’च्या बहुतेक क्षेत्रांत आज मनोज तिरोडकर आहेत. त्यांचे आडनाव टाटा, बिर्ला व अंबानी नाही. नाही तर १००-२०० कोटींच्या व्यवहाराचीही जोरात चर्चा झाली असती. अलीकडच्या काळातील सर्वात मोठा सौदा ‘एअरसेल’ कंपनीचा ८,४०० कोटींचा होता. या सौद्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले होते, पण तिरोडकरांच्या कंपनीने ५०,००० कोटींचा सौदा करून भल्याभल्यांच्या जिव्हा हातभर बाहेर काढल्या आहेत. तिरोडकर म्हणतात. When we look at risk and how to tackle it, we are looking at how to structure theopportunity the investment in the opportunity. संकटे येतच असतात, अडथळे येणारच, पण त्यावरच ‘संधी’चे टॉवर्स उभारायचे असतात, त्यातच फायदा आहे, असेच तिरोडकरांनी सांगितले. धीरूभाई अंबानी एके ठिकाणी स्वतःविषयी नेमके हेच म्हणतात की, “घनघोर अंधार समोर असतानाही मी स्वप्न पाहू शकत होतो. संकटे जेव्हा माझ्या उरावर धडका मारीत होती, तेव्हा मी मंद स्मित करीत होतो. शिखर तेव्हा दूर होते आणि मार्ग जेव्हा काट्याकुट्यांचा होता तेव्हादेखील मी चालत होतो.” तिरोडकरांचीही जिद्द तीच आहे. धीरूभाई सुरुवातीस लवंग, दालचिनी, वेलची वगैरे मसाल्याचे पदार्थ सौदी-अरेबियात विकत होते. हा त्यांचा संघर्षाचा काळ होत. हाच संघर्ष तिरोडकरांच्याही वाट्याला आला. त्यांनी मसाल्याचे पदार्थ कदाचित विकले नसतील.

मराठी माणसांची बदनामी
मराठी माणूस हा उद्योगधंदा करू शकत नाही हा एक सार्वत्रिक समज आहे. मराठी माणसांची ही बदनामी आहे. मराठी माणूस लढवय्या, शूर वगैरे असेल, पण पैसे कमविण्याची त्याला अक्कल नाही, म्हणून तर ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ अशी घोषणा ३०-३५ वर्षांपूर्वी मराठी माणसाला डिवचण्यासाठी दिली गेली, पण शिवसैनिकांनी या बदनामीस उत्तर देणारी ‘मूंहतोड’ घोषणा तेव्हा दिली होती. ३०-३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसांची काय मानहानी होत होती! तर ‘मराठी माणसे भांडकुदळ आहेत. काम करायची त्यांना सवयच नाही. कामाच्या पूर्वीच दाम मागण्याची त्यांना आदत आहे. ती अर्धा तास कामावर लेट येतील, आल्यानंतर अर्धा तास तंबाखू चघळतील, जेवणानंतर त्यांची वामकुक्षी लांबेल आणि पाचला त्यांचे, काम संपणार असेल तर चारपासूनच ती घड्याळाकडे पाहू लागतात.’ अशा एक ना हजार गोष्टी मराठी माणसांसंबधी या मुंबईत गेली अनेक वर्षे बोलल्या जात आहेत. मराठी माणूस तेवढा कामचुकार आणि बाकी सारे कष्ट करणारे. आपापले काम मन लावून करणारे काय? मराठी लोक म्हणजे ‘रामागडी’. मराठी बायका म्हणजे उपऱ्यांच्या घरच्या ‘मोलकरणी’. आजही हिंदी सिनेमा व टी.व्ही. सीरियल्समधून मराठी बाया, नऊवारी साडीतल्या मोलकरणीच दाखविल्या जातात. मराठी माणूस निर्बुद्ध, बिनकामाचा ही बदनामी थांबविण्याचे काम आता मनोज तिरोडकरांनी केले. याआधी उद्योग, विज्ञान, कला क्षेत्रात अनेक मराठी माणसांनी गरुडझेप घेतली, पण ‘मराठी’ माणसाला कमी लेखण्याची जणू स्पर्धाच सुरू असते. पैशाची भाषा आता सगळ्यांना कळते. त्यामुळे तिरोडकरांनी पैशाच्या भाषेतच सगळ्यांना उत्तर दिले.

आम्ही टॉवर्स विकतो
मुंबईसारख्या शहरात भय्या चणे विकतो, पाणीपुरी विकतो व जगतो. मराठी माणसाला कष्टच करायला नको अशी टीका नेहमी होते. ‘मराठी माणूस चणे-कुरमुरे विकत नाही, तो मोबाईलचे ‘टॉवर्स’च विकतो व अंबानींशी बरोबरी करतो’ असे आता उत्तर द्यायला हवे. हर्षद मेहता, केतन पारेखप्रमाणे तो लांड्यालबाड्या व शेअर घोटाळे करून बँका बुडवून श्रीमंत होत नाही तर कष्ट करून, घाम गाळून ५०,००० कोटीचा सौदा करतो. मराठी पाऊल उद्योगात मागे पडते, कारकुनीत मराठी मन रमते हा आक्षेप पुसायला हवा. मराठी माणसालाही श्रीमंत होण्याची, पैसे कमविण्याची (खाण्याची नव्हे) चटक लागायला हवी. वाघाला जशी रक्ताची चटक लागते तशी ही चटक हवी. शिकार शोधावी तसा नवा धंदा, नवा सौदा, नवा व्यवहार शोधायला हवा तर तो श्रीमंत होईल. शिवरायांच्या तलवारीने इतिहास निर्माण केला. त्या इतिहासावर जगणे शेतकऱ्यांना जमले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. त्या इतिहासाने रोजीरोटी वाचवली नाही म्हणून गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला. तलवाअ म्यान करून हाती तागडी घेतली तर मराठी माणसांचा निभाव लागेल. मुंबईसारख्या शहरातील पैसा बाहेर जातो, कारण तो कमवणारे उपरे आहेत. राजकारणातून जे श्रीमंत झाले त्यांस उद्योग म्हणायचे असेल तर महाराष्ट्र श्रीमंतच झाला असे मानूया. राजकारण्यांची व सहकार सम्राटांची श्रीमंती खरी नाही. त्यांची श्रीमंती मनोज तिरोडकरांच्या टॉवर्सपुढे थिटी पडली आहे.

दंतकथाच…
मनोज तिरोडकर कोठे राहतात, काय खातात, काय पितात हे कुणाला माहिती नाही. त्याचे प्रदर्शन व मार्केटिंग तिरोडकरांनी कधी केले नाही. इतर उद्योगपतींप्रमाणे त्यांनी स्वतःवर पुस्तके छापून घेतली नाहीत, पण कालच्या एका सौद्याने मनोज तिरोडकर हे एक दंतकथाच बनले आहेत. पुन्हा एकद धीरूभाई काय म्हणाले सांगतो. ते सांगतात.

“आता आता अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी अगदी सामान्य माणूस होतो आणि लोक विचारीत असत, कोण हा धीरूभाई? आमच्या केबिनच्या बाहेर तासन्तास तिष्ठत बसणारा तो व्यापार? ही गोष्ट अगदी खरीच आहे आणि मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. नशिबाने मी अगदी गेंड्याच्या कातडीचा माणूस आहे. ‘हाथी चले अपनी चाल’ हा एक सर्वज्ञात नियम आहे.” धीरूभाईने जे सांगितले ते मनोजच्या बाबतीतही लागू पडते, पण दोन बदल करावे लागतील. मनोज सामान्य माणूस नाही व त्याची कातडी गेंड्याची नाही. बाकी तो सर्वार्थाने धीरूभाईच आहे! ‘धीरूभाई’ मनोज तिरोडकर! कुणाला शंका?