दिनचर्या

दुर्लभ मानदेह, त्याचा जीवनोद्देश, तो साध्य करण्यासाठी मिळू शकणारा मर्यादित कालावधी, उपलब्ध वेळ व साधावयाचे काम या सर्वांचा विचार करता, योग्य नियोजन व त्यासाठी प्रत्येक दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग- म्हणून सर्वसाधारण तरीही विशिष्ट दिनचर्या सुचविली गेली. पहाटे उठावे. बहुधा घरातील व्यक्तींचे जागरण -भूपाळ्यांच्या आवाजाने होत असे. ( अंथरुणावरच ) बसून.
‘ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती ।
करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम ॥’
हा श्लोक, नंतर ओणव्याने वा भूमीला पदस्पर्श करण्यापूर्वी ‘ समुद्रवसने देवी ’ श्लोकाने भूमिवंदन, शौच, मुखमार्जन, देवाला व गुरुजनांना वंदन, थोडा व्याया,अ, ( यात योगासने, प्राणायाम वगैरे असावे ) दुग्धप्राशन, अभ्यास वा चिंतन, स्नान, स्तोत्रपठण, दैनंदिन कामकाज, दुपारी भोजन, वामकुक्षी, थोडे वाचन, कामकाज, संध्यावंदन, रात्रीचे भोजन, शतपावली, कुटुंबीयांशी संवाद शय्येला व अष्टदिशांना वंदन करून झोप.

या दिनचर्येत कृतज्ञता बुद्धी, शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक, वडीलधाऱ्यांबद्दल आदरबुद्धी यांचे दर्शन तर होतेच, पण ‘ गंगेच यमुनेचैव ’ या स्नानमंत्राने राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागृत राहतो. भोजनमंत्राने परस्पर सहकार्याची, सगळ्यांनी एकत्र येऊन एकविचाराने, एकसाथ काम करण्याची भावना निर्माण होते. आजही शास्त्रज्ञांना ज्या सर्वश्रेष्ठ अतींद्रिय-जगच्चालक शक्तीबद्दल निश्चित काही सांगता येत नाही, तिला सकाळ संध्याकाळ श्रद्धापूर्वक ( भीतीने नव्हे ) वंदन केले जाते व त्याचबरोबर ज्यांनी माणुस म्हणून जन्मास घातले त्या मातापित्यांना तसेच इतर वडीलधाऱ्यांनाही नमस्कार केला जातो. तेजमूर्ती सूर्याला वंदन करण्याआधी ‘ सूर्याआधी नमस्कार पूर्वदिशेला करावा ’ याचे पालन होते. संधिकालात दुष्प्रवृत्तींची होणारी वाढ संध्यावंदनाने खुंटते. स्वतःचा कणकण झिजवून क्षणक्षण उजाळणाऱ्या दीपज्योतीला वंदन केले जाते. घरात येणाऱ्या धनलक्ष्मी, विद्यादेवी यांचे स्वागत केले जाते. दिवसभराच्या कामकाजात कुटुंबीयांचा समाजाशी संबंध आलेला असतो. त्यातून मिळालेल्या आनंद, समाधानाचे वाटप, अयोग्य गोष्टी व त्याचप्रमाणे विविध समस्या यांच्या निराकरणाचा विचार, दुसऱ्या दिवसाची कार्ययोजना, कुटुंबीयांच्या मनाची जपणूक आदी आवश्यक गोष्टींसाठी सगळे एकत्र आल्यानंतरचा वेळ राखून ठेवलेला असतो. आवश्यक व्यायाम व स्वतःला ज्यात आवड आहे, अशा छंदासाठी प्रत्येक कुटुंबघटकाला तोडा वेळ मिळाला पाहिजे. याकडेही लक्ष दिले जाते. वैयक्तिक प्रगतीइतकाच सामूहिक विकास आवश्यक आहे याची जाण व भान यातूनच निर्माण होते. फत्क ‘मी ’ नव्हे, ‘ आम्ही, आपण ’ हा संस्कार कळत-नकळत होत असतो.