डोकेबाज यमदूत

एक मुर्तीकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहुब बनवी ज्याची मुर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई.

त्याने खुर्चीवर बसलेल्या व हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता, त्या पुतळ्याला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढल्या फ़ाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहुब होता की खराखुराच रखवालदार पहाऱ्यावर बसला असल्याचा चोर दरोडेखोरांचा समज होऊन, ते त्या मुर्तीकाराच्या घराच्या आसपास फ़िरकण्याचा विचार सोडून देत.

नामवंत कलावंत म्हणून, त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले. आता ‘आपली शंभरी निमित्त जंगी सत्कार व्हावा एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती; म्हणून तो प्रकृतीची फ़ार काळजी घेत होता. यमदुताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे तयार केले होते. अगदी सही सही स्वत:सारखे.

एकदा त्याला, आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळ्यात दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक, असे दहा मुर्तीकार ! काही म्हणजे काही फ़रक नाही ! ‘यातल्या कुणाला घेऊन जावं ?’ हा त्यांच्यापुढे पेच पडला.

तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकाऱ्यांना मुद्दाम म्हणाला, ‘बाबांनो ! अस गोंधळून जाण्यासारखं काय आहे? कारण खऱ्या मुर्तीकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळ्यात दाखवायचं राहून गेलं आहे.

त्या बुद्धीवान यमदूताच्या या विधानानं अपमानित झालेला त मुर्तीकार पटकन उठून म्हणाला, ‘उगाच जीभ आहे, म्हणून काहीतरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष, मी या पुतळ्यांअ दाखविलेला नाही?’

यावर तो चतूर यमदूत म्हणाला, ‘हे चित्रकारा ! तुझ्यात आणि तुझ्या या पुतळ्यात काहीएक फ़रक नाही. पण ‘तुझ्याप्रमाणे हे तुझे पुतळे नाहीत’ असे म्हटले की, अपमान होऊन तू काहीतरी बोलू लागशील, असे मला वाटत होते. माझ्या अंदाजाप्रमाणे तू बोललास आणि या चित्रशाळेतील दहा पुतळ्यात मिसळून गेलेला खरा चित्रकार कोणता, हा आम्हांला पडलेला पेच तू स्वत:च सोडविलास. चल आता आमच्या संगे’.