दोन कोंबडे

एका उकिरडयाच्या मालकीसंबंधाने दोन कोंबडयांचे युध्द जुंपले. एका कोंबडयाने दुसऱ्या कोंबडयास इतका बेदम मार दिला की, तो बापडा भयाने एका खबदडीत जाऊन लपून बसला. पहिल्या कोंबडयास आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका शेजारच्या खोपटावर बसून, ‘मी लढाई जिंकली’ ‘मी लढाई जिंकली’ असे मोठमोठयाने तो ओरडू लागला. त्यावेळी आकाशांतून एक गरूड चालला होता, त्याने त्यास पाहिले आणि मारून खाण्यासाठी धरून नेले! दुसरा कोंबडा लपून बसला होता, तो, हा प्रकार पाहतांच, बाहेर पडला आणि मोठया डौलाने इतर कोंबडयांत जाऊन बढाई मारू लागला.

तात्पर्य:- एखादया कार्यात आपणास यश आले म्हणून तेवढयासाठीच गर्वाने फुगून जाऊ नये कारण कोणाचे नशीब केव्हा फिरले याचा नेम नाही.