दुर्दैवी जोडपे

एका मनुष्याची बायको फार कर्कशा असल्यामुळे, त्यांच्या घरात नेहमी भांडण चालू असे. एकदा ती स्त्री आपल्या माहेरी गेली असता, तिला परत घरी आणण्यासाठी तिचा नवरा तेथे गेला. त्याने आपल्या बायकोस विचारले, ‘तुझा वेळ येथे कसा काय गेला ? काही भांडणतंटा झाले नाही ना ?’ बायको उत्तर करते, ‘माझ्या माहेरच्या माणसांना मी फारशी आवडले नाही; येथील गडीमाणसांस देखील माझा कंटाळा आला असाव असे त्यांच्या चर्येवरून दिसते. यावर तिचा नवरा म्हणाला, ‘आता तूच पहा की, सगळा दिवस बाहेर जाऊन काम करीत असल्यामुळे जे तुझ्या दृष्टीस दिवसांतून कचितच पडत असतील, त्या गडीमाणसांसही जर तुझा स्वभाव आवडत नाही, तर सगळा दिवस तुझ्या सहवासात घालविणारा जो मी त्या मला तुजपासून किती त्रास होत असेल बरे ?’

तात्पर्य:- जेव्हा आपण सर्वांसच अप्रिय होतो, तेव्हा तो दोष आपल्याच स्वभवाचा असला पाहिजे असे समजून, तो स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.