गोनीदा यांच्या दुर्गचित्रांचे प्रकाशन

गोपाल नीलकंठ दांडेकर

गोपाल नीलकंठ दांडेकर

गोपाल नीलकंठ दांडेकर उर्फ अप्पा, हे समस्त डोंगरभटके आणि दुर्गप्रेमींचे दैवत. येत्या बुधवारी (दि. १३) अप्पांनी टिपलेल्या दुर्मिळ छायाचित्रांच्या ‘दुर्गचित्र’ या संग्रहाचे सायंकाळी टिळक स्मारक मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

ही छायाचित्रे सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विलक्षण जिद्द यातून क्लिक झाली आहेत. गोनीदांची दुर्गचित्रे हा ११५ छायाचित्रांचा संग्रह त्यांच्या कन्या डॉ. वीणा देव यांनी संकलित-संपादित केला आहे. रसिकांना सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तूंची रुपे कृष्णधवल चित्रांमधून आढळतील. वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या दुर्गांच्या प्रतिमा दिसतील.

‘साहित्यिक आणि छायाचित्रकार, लेखणी आणि कॅमेर्‍याची लेन्स, यात फरक आहे. पण, गोनीदांच्या दृष्टीने पाहिले तर यात काहीच फरक नाहीये. अप्पांना गडदुर्गांच्या तटबंदीत बसविलेल्या चिर्‍यांसह वार्‍यावर डोलणार्‍या फुलांचीही भाषा कळत असावी. म्हणूनच दुर्गप्रेमींना वाटत राहते की अप्पांचे बोट धरुनच गड पहावा. त्या-त्या प्रदेशातील बोलीभाषा, खास ठेवणीतले शब्द, माणसं पेहराव, चालीरिती जसे अप्पांच्या लिखाणातून उलगडत जातात तसेच त्यांच्या लिखाणातून निसर्गही थेट मनाला भिडून जातो. अप्पांनी १९६० ते १९८३ या कालखंडात भटकंती करून दुर्ग, लेणी, गुहा, मंदिर यांची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. त्यांच्या पुस्तकातून त्यातील निवडक छायाचित्रे पाहता येतात. पण या संग्रहाच्या निमित्ताने त्यांची कलात्मक छायाचित्रे प्रेक्षकांसमोर उपल्ब्ध होणार आहेत,’ असे डॉ. वीणा देव यांनी सांगितले.