शिक्षण

शारीरिके शिक्षण, हस्तकला व चित्रकला यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही राज्यात स्थापन झाल्या आहेत. आणि गेल्या २५ वर्षांत माध्यमिक शिक्षणानंतर तांत्रिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या असून त्यांच्या अभ्यासक्रमाना जोरदार मागणी आहे. बहुतंत्रज्ञान देणाऱ्या संस्थामध्ये ( पॉलीटेक्रिक्समध्ये ) दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश असून तिथे औषधे, रसायने, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांचे अभ्याक्रम आहेत. बहुतंत्रज्ञान व तंत्रज्ञान देणाऱ्या संस्थामध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम अत्यंत व्यवहारोपयोगी आहेत. पण तरीदेखील तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाकडे लवचिक दृष्टीने पाहून पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना काही थोड्या वर्षांच्या अनुभवानंतर, पदवीला प्रवेश घेण्याची संधी देणे आवश्यक आहे. असे पुढाकारी उपक्रम विद्यार्थ्यांना वरच्या स्तराकडे प्रगती करण्याची संधी देतील व महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन शिक्षणावरील भार हलका करतील. मध्यम पातळीवरील या तंत्रज्ञांचे कसब व त्यांची रोजंदारी क्षमता या उपक्रमांमुळे वाढेल व त्याची देशाच्या विकासाकरता अत्यंत आवश्यकता आहे.

१९६७ ते १९७० या दशकात महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमांकरता नावनोंदणी प्रतिवर्षी १४ टक्क्यानी वाढली. पण १९८० पर्यंतच्या नंतरच्या दशकात ती वाढ ४ ते ५ टक्क्यावर स्थिर झाली. मागास भागात वरिष्ठ पातळीवरील संस्थाची स्थापना सरकारेने केली आहे. १९७३ ते १९८४ मध्ये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांची संख्या ३८० पासून ४६३ पर्यंत वाढली असून याच काळात नावनोंदणी दुपटीने वाढली आहे. गेल्या दशकात विद्यार्थिनींची पटावरील संख्या ८८,००० वरून १,९४,००० पर्यंत वर गेली आहे. विद्यार्थिनींच्या नावनोंदणीच्या टक्केवारीच्या वाढीत एकंदर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर असली तरी उच्च शिक्षणात जास्त प्रमाणात आहे. एक आवार विद्यालय, महाविद्यालय, इंग्रजी, गणित व विज्ञानाच्या शिक्षकांकरता नोकरीतच प्रशिक्षण कार्यक्रम, शिक्षकांकरता उपयुक्त पुस्तिका तयार करणे असे अनेक नवे उपक्रम कार्यवाहीत आणण्यात आले आहेत.

धंदे शिक्षणाकरता राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने एक मोठी योजना आखली आहे. धंदेशिक्षणाचा +२ या पातळीवर आरंभ करण्याबाबत भारत सरकारने नेमलेल्या राष्ट्रीय पहाणी समितीने व वर्किंग ग्रूप ऑन व्होकेशनलायझेशनने काही विशिष्ट सूचना केल्या आहेत महाराष्ट्र सरकारने या सूचनांचा खाली नमूद केलेल्या मर्यादांच्या विचार केला; (१) दिलेल्या एका मर्यादित विभागात नेमकी कोणती व किती पातळीपर्यतची कसबे आवश्यक आहेत हे ठरविणारे धंदेविषयक आढावे उपलब्ध नाहीत; (२) मनुष्यबळाची नेमकी कमरता कोठे ते दर्शविता आलेले नाही; (३) मार्गदर्शक प्रयोगांच्या सुरवातीला तरी ठराविक कालावधीचे अभ्यासक्रम घेतल्याने विश्वविद्यालयात प्रवेश न मिळून विद्यार्थ्यांच्या हितास बाध येणे; (४) आणि पांढरपेशा नोकऱ्यांना व विश्वविद्यालयीन शिक्षणाला समाजात असणारी किंमत. अखेरीस महाराष्ट्र राज्य सरकारने ठराविक कालावधीत पूर्ण होणारे धंदेशिक्षणाचे स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी द्विपदरी अभ्यासक्रम सुरू करायचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांना लहान मुदतीचा पुलवजा अभ्यासक्रम पूर्ण करून अभ्यासक्रम ताबडतोब रोजगार शोधणे शक्य होईल किंवा पदवी मिळेल असा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पुढे घेता येईल. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) यानी खालील योजना अवलंबिली आहे. विद्यालयीन सहा विषयांपैकी विद्यार्थ्यांने एक भाषा व तीन ऐच्छिक विद्यालयीन विषय निवडायचे व दुसरी भाषा आणि एक ऐच्छिक विद्यालयीन विषय याऐवजी धंदेशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे प्रत्येकी १०० गुणांचे दोन विषय घ्यायाचे. याने विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या शर्ती पूर्ण करण्यासाठी मुख्य विषय शिकून त्याच वेळी धंदेशिक्षणातली विशिष्ट कसबे आत्मसात करणे शक्य होते. विश्वविद्यालयीन शिक्षणापेक्षा धंदेशिक्षण नित्कृष्ट आहे हा समज टाळण्याच्या एकाच दृष्टीने राज्य सरकारने राष्ट्रीय समितीच्या धोरणापेक्षा वेगळे धोरण अंगिकारले. समाजाला त्यांची उपयुक्तता पटल्यावर हळूहळू तंत्रज्ञानाच्या धंदेशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होईल.

शिक्षण व संशोधन याखेरीज विश्वविद्यालयांनी गेली दहा वर्षे, विशेषतः १९८१ पासून, विस्तार अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यापैकी बहुसंख्य संस्थानी अखंड शिक्षण व विस्तार शिक्षणाचे विभाग स्थापले असून लोकांचे ज्ञानव कसबे अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवता सुधारण्यासाठी विज्ञान (शास्त्र) व कला (वाङ्‍मय) शाखांसाठी महाविद्यालय सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आले असून निरनिरळ्या विषयांच्या विभागांस विशेष मदत म्हणून विश्वविद्यालय अनुदान आयोगाने मदत दिली आहे. संगणनशास्त्र, उपकरणशास्त्र व अनेक शाखासमावेशक विषयांच्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय विकासाच्या वर्तमान व भावी योजनांच्या दृष्टीने आरंभ करण्यात आला आहे. थोडक्यात म्हणजे शिक्षण व प्रगती यातील तफावत दूर करून त्यांची जुळवणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुष्कळ साध्य झाले आहे पण अजूनही खूप करायचे आहे. नाथीबाई दामोदर ठाकरसी विश्वविद्यालयाच्या मुक्त विश्वविद्यालय कार्यक्रमाप्रमाणे व इतर संस्थांच्या, त्याचप्रमाणे मुंबई विश्वविद्यालयाच्या, दूरस्थ शिक्षण कार्यक्रमासारखे अनौपचारिक कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात हाती घेतले जाऊन त्यामुळे तरूण पिढीच्या वाढत्या आकांक्षा पुरवल्या जातील अशी आम्हाला प्रबल आशा आहे.