सण-उत्सव एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करुन साजरे करावेत – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी प्रकाश महाजन

जिल्हाधिकारी प्रकाश महाजन

धुळे : आगामी सण-उत्सव एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करुन साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी केले. आगामी बकरी ईद, नवरात्रोत्सव, रथोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस अधीक्षक मोहन पवार, उपविभागीय अधिकारी नंदकुमार बेडसे, महानगरपालिका आयुक्त जीवन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्यास प्रतिबंध करावा, आपण आपल्या डोळ्याने पाहिलेल्या व कानाने ऐकलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवावा. अफवांमुळे समाजात आणि जाती-जातीत वैमणस्य येते. महिलांनी दागिणे जरुर घालावेत पण ते सुरक्षित राहतील याचीही दक्षता त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्या सुरक्षितेसाठी जागरुक राहणे आवश्यक आहे. मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे शिक्षण देणे आवश्यक आहे, जेणेकरुन त्या आपली सुरक्षा स्वत: करु शकतील. सणासुदीच्या काळात माध्यमांचीही मोठी जबाबदारी असून त्यांनी योग्यप्रकारे जनतेला माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

सणासुदीच्या काळातील बंदोबस्तासंदर्भात बोलताना श्री. देशपांडे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार करण्यास आपण यशस्वी झालो असून एकमेकांशी चांगला संवाद असल्याने गैरसमज राहिलेले नाहीत. नवरात्र, बकरी ईद यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. या काळात अधिक प्रमाणावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्यानंतर मतमोजणीसाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. नवरात्रीच्या काळात एकवीरा माता मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी टेहळणी मनोरे आणि सी.सी. टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी ज्या उणिवा आढळल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आला आहे. एकवीरा मंदिरात ज्याप्रमाणे सी. सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्याप्रमाणेच दुर्गोत्सव मंडळांनीही सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. सोनवणे यांनी सांगितले, मूर्ती विसर्जणासाठी धुळे शहरात तात्पुरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मिरवणूक मार्गाची स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त महानगरपालिकेकडून केला जाणार आहे.

यावेळी शहर पोलीस उप अधीक्षक मोणिका राऊत, जूगलकिशोर गिंदोडीया, इस्माईलभाई पठाण, एम.जी.धिवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन धुळ्याचे उपविभागीय अधिकारी नंदकुमार बेडसे यांनी केले.