एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही

भोजराजाकडे एक पोपट होता. तो फ़क्त /एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही’ हे एकच वाक्य म्हणे. राजा एकदा त्या पोपटाला घेऊन राजसभेत आला. सवयीप्रमाणे तिथेही पोपटाने त्या वाक्याच स्पष्टपणे उच्चार केला. त्याचं ते विधान ऎकून राजसभेतील प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला.

राजसभेतील विद्वान मंडळीना भोजराजानं विचारलं, ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही’ असं जे पोपट म्हणतो, ते कोणत्या गोष्टीला उद्देशून आहे?’

यावर प्रत्येकान आपापल्या परीन उत्तर दिलं, पण कुणाच्याच उत्तराने राजाचं समाधान झालं नाही. अखेर तो म्हणाला, ‘हे पाहा, सहा महिन्यांच्या आत मला या विधानाचा पुराव्यासह समाधानकारक खुलासा हवा; अन्यथा मी तुम्हा सर्वांना नोकरीवरून काढून टाकीन. हे स्पष्टीकरण तुम्ही स्वत: द्या किंवा दुसऱ्या कुणाकडून देववा, त्या गोष्टीला माझी हरकत नाही.’
राजानं दिलेली ही तंबी ऎकून, दरबारी मंडळींच्या तोंडाचं पाणी पळालं.

राजसभेतील ‘अभिलाषानंद’ या नावाचा पंडित गावात रहाणाऱ्या ‘चरवाह’ या नावाच्या एका अतिशय हुशार पंडिताकडे गेला व त्याने त्याला आपल्यापुढे राजानं उभ्या केलेल्या समस्येची माहिती दिली.

ती ऎकून पंडित चरवाह म्हणाले, ‘पंडित अभिलाषानंद ! घाबरु नका, पोपटाच्या तोंडच्या त्या वाक्याचा पुराव्यासह अगदी समाधानकारक अर्थ मी राजाला सांगतो. फ़क्त तुम्ही मला तुमच्याबरोबर राजाकडे न्या. मात्र राजाकडे जाताना हा समोरच्या अगंणात बसलेला कुत्राही बसणाऱ्या राजाकडे घेऊन जाण्याची ताकद मजमध्ये नाही. त्यामुळे त्या कुत्र्याला तुम्ही उचललं पाहिजे; आहे मान्य?’

त्या कुत्र्याला पाहून पंडित अभिलाषानंदाला किळस वाटली. लूत भरल्यामूळे तो कुत्रा नुसता गलिच्छ झालेला नव्हता, तर अंगात ठिकठिकाणी खरे पडल्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी येत होती. पण ‘राजसभेतील मोठया वेतनाची नोकरी टिकविणे लाषानंदाने पंडित चरवाहांची ती अट मान्य केली, आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या गलिच्छ कुत्र्याला उचलून व पंडित चरवाहांना बरोबर घेऊन राजसभेत गेला.

त्याला तशा तऱ्हेने आलेला पाहून भोजराजानं विचारलं, ‘ पंडित अभिलाषानंद ! चरवाहांना घेऊन येण्याचा हेतू काय?’

पंडित अभिलाषानंद म्हणाला, ‘महाराज ! ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही, ‘असं जे आपले पोपटराव म्हणतात, त्याचा समाधानकारक खुलासा पंडित चरवाह हे अगदी पुराव्यासह करायला तयार आहेत.’

राजानं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच पंडित चरवाह त्याला म्हणाले, ‘महाराज ! लोभाएवढी वाईट गोष्ट या जगात दुसरी नाही.’

आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळाल्यामुळं अंतरी समाधान पावलेल्या राजानं विचारलं, ‘पण याला पुरावा काय ?’

यावर पंडित चरवाह म्हणाले, ‘वास्तविक या पंडित अभिलाषानंदाची घरची परिस्थीती फ़ार चांगली आहे. राजसभेतील नोकरी सुटली, तरी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. तरीसुध्दा मी घातलेल्या अटीप्रमाणे ते या लूत भरलेल्या व खरे पडलेल्या कुत्र्याला उचलून, त्याला आपल्यासमोर घेऊन येण्याचे जे लाजिरवाणे कृत्य करायला तयार झाले, ते नोकरी टिकवण्याच्या लोभापायीच ना?’

पंडित चरवाहांनी केलेल्या या खुलाशांन राजाचे पूर्ण समाधान झाले. त्याने त्याल इनाम दिले व दिलेल्या शब्दाप्रमाणे पंडित अभिलाषानंदाला नोकरीवर राहू दिले.