फणसाची सांदणे

साहित्य :

  • १ मोठी वाटी तांदळाचा रवा
  • २ मोठ्या वाट्या गऱ्यांचा रस
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • पाव वाटी पाणी
  • पाव चमचा मीठ
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • एक-अष्टमांश खायचा सोडा.

कृती :

रवा कोरडाच भाजून घ्यावा. नंतर सर्व वस्तू एकत्र करून पीठ तयार करावे. नंतर स्टीलच्या मध्यम आकाराच्या तीन थाळ्यांना तुपाचा हात फिरवून त्यात वरील पीठ ओतावे व ह्या थाळ्या मोदकपात्रात १५ मिनिटे ठेवून वाफवाव्या. कोकणात सांदणे हा सगळ्यांचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. जेवणाच्या वेळी मुख्य पदार्थ म्हणून सांदणे करतात. तेव्हा सांदणे दुधात बुडवून खातात. तांदळाच्या रव्याऐवजी गव्हाचा रवा वापरूनही सांदणे करतात.

बरक्या फणसातील गऱ्यांचा रस काढावा. हा रस स्टीलच्या चालणीवर गाळून घ्यावा किंवा जाड जाली लावून पुरणयंत्रातून काढावा. ३० ते ३५ मोठ्या गऱ्यांचां वाटीभर रस निघतो. गरे लहान असतील तर जास्त गरे लागतील.