आमच्यावरचे गुरुंचे छत्र नाहिसे झाले

वामनराव पै

वामनराव पै

‘सद्गुरु वामनराव पै यांना आम्ही फक्त गुरु मानत नसून आम्ही त्यांना आमचे आई, वडील, मित्र सर्व काही मानत होतो. गुरुंना रोज भेटणे शक्य नव्हते पण ते कायम आपल्या पाठीशी आहेत, हा एकच विचार आम्हाला खूप आधार देत होता. मात्र आज आमच्यावरचे गुरुंचे छत्र नाहिसे झाल्यामुळे आम्हाला आज अनाथ झाल्यासारखे वाटत आहे’, या पोरक्या झाल्याच्या भावना वामनराव पै यांच्या शिष्यांनी त्यांच्या दुःखद निधनानंतर बुधवारी व्यक्त केल्या. ज्या गुरुंनी अनेकांना जगण्याचा मार्ग दाखविला त्या गुरुंना अखेरचे वंदन करण्यासठी उपासकांची गर्दी झाली होती व प्रत्येकाच्या मनात ‘गुरुविण नाही दुजा आधार’ ही भावना मनात दाटून आली होती.

वामनराव पै यांच्या भक्तांनी त्यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचण्या आधीच अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. बेळगाव, कारवार, गोवा व राज्याच्या इतर भागांमधून लोक आले होते. अंत्यदर्शन घेताना प्रत्येकाचे पाय जड झाले होते. आता पुन्हा आपल्याला गुरुंचे दर्शन होणार नाही, या भावनेने सर्वांचे डोळे भरून आले होते व ही भावना अनेकांना हेलावून टाकत होती. गुरुंनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान आयुष्यभर जपायचे व त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरुनच पुढे जात रहायचे, हे त्यांचे पुढील ध्येय भक्तांनी सांगितले.