फ्लोराईडमुक्त पाणी पहिला प्रयोग

चंद्रपूर जिल्ह्यातल्या २४० गावातील पाणी आरोग्याच्यादृष्टीने अयोग्यच. या गावातील ५६० विहिरी, बोरवेल्समध्ये फ्लोराईडचे प्रमाण १.५ इतके आढळले आहे. फ्लोराईड मिश्रीत पाणी पिल्याने सांधे, हातपाय दुखणे, दात झिजणे, हातपायात अथवा शरिरास वाक निर्माण होणे, अकाली वृद्धत्व येणे, शरीर फुगीर होणे अशी लक्षणे आढळतात. शिवाय हे पाणी पिण्यास बेचव, खारट, तुरट आणि पचण्यास जड असते. या गावातील आरोग्याच्या अशा तक्रारी आढळून येऊ लागल्या. ह्या समस्या बऱ्याच वर्षापासून असल्याने जिल्हा प्रशासन गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाणी कसे देता येईल या विवंचनेत असताना वाटर लाईफ कंपनीच्या फ्लोराईड रिमुव्हल युनिटचे अधिकारी चंद्रपूरला आले. त्यांनी चंद्रपुर पासून २० किलोमीटरला असलेल्या साखरवाही गावात मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एका बोरावेलवर फ्लोराईडस रिमुव्हल युनिट तत्काळ लावण्याची सूचना केली.

फ्लोराईड रिमुव्हल युनिट हे बोरवेल्सवर लावले आणि पाण्याचा उपसा केला. तर नळाच्या एका बाजूने गोड पाणी व एका बाजूने फ्लोराईडयुक्त पाणी येऊ लागले. पिण्यालायक पाणी मिळू लागल्याने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या या गावात १८ बोरवेल्स आहेत. मात्रा, प्रायोगिक तत्त्ववर एकाच हातपंपावर (बोरवेल्सवर) एफ.आर.यु. बसविले आहे. फ्लोराईड रिमुव्हल युनिटमधून निघालेले पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता फ्लोराईडचे प्रमाण १.५ टक्क्याहून ०.४५ टक्के इतके आढळले. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत पाणी एकदम स्वच्छ आढळले. गावकऱ्यांनी या प्रयोगाचे उद्घाटन रितसर करून देता पाणी पिण्यास वापरू लागले. हे सयंत्र लावून १२ दिवस झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी या प्रयोगाला दोनवेळा भेट दिली. तर जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांचे या सुविधेबद्दल मनोगत जाणून घेतले. राज्यातील प्रायोगिक तत्त्वावरील हा पहिला प्रयोग आहे. या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावकऱ्यांना केल्या. एक बोरला ४०,००० रुपये तर या प्रयोगास अडीच लक्ष रुपये खर्च येतो. त्यामुळे हे यंत्र प्रत्येक बोरवेल्सवर लावता येणार नाही. मात्र, प्रत्येक गावात एक असे एफ.आर.यु. सयंत्र लावण्यात येणार आहे. एकाच बोअरमधून पिण्याचे पाणी येत असल्याने पाण्यासाठी भांडण न करता वेगवेगळ्या वेळा ठरवून पाणी घेण्याच्या सूचना त्यांनी गावकऱ्यांना दिल्यात. या प्रायोगिक पाणी पुरवठ्याने ग्रामस्थ जाम खूष आहेत. आणि शासनाने प्रत्येक वार्डात असे एक एफ.आर.यु. लावावे, अशी मागणी करीत आहेत. या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलो असता अनायसे कंपनीच्या अधिकाऱ्याची भेट झाली. त्यांना या एफ.आर.यु. सयंत्राबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, उत्तरप्रदेश, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या चार राज्यात प्रत्येकी एकेक हजार फ्लोराईड रिमुव्हल युनिट सयंत्र लावले त्याचे चांगले रिझल्ट आले आहेत. ही सयंत्रे लावल्यास कंपनी पाच वर्ष देखभाल करते. लोकसंख्येच्या प्रमाणावर तसेच पाण्यातील दूषितपणानुसार सयंत्रे लावले जाते व त्याची रक्कमही कमी जास्त होऊ शकते.

गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच कार्तीक खुटेपाटे, समाजिक कार्यकर्ते नामदेव डाहुले यांनी साखरवाहीत पहिल्यांदा फ्लोरईडमुत सुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनास धन्यवाद दिले. याच गावातील शोभा उरकूडे, यशोधरा पाझारे म्हणल्या, हे पाणी पिण्यास उत्तम असून डाळ भाजी लवकर शिजते. पूर्वी डाळ शिजवायला अर्धातास लागत होते. आता १५ मिनिटात शिजते. पूर्वीचे पाणी पिण्यास चवदार नव्हते. अधूनमधून हातपाय दुखायचे आता हातपायही दुखत नाही. तर रेखा कामतवार म्हणाल्या, पूर्वी पाण्यात जंतू नारू आढळायचे. आता ते आढळत नाहीत. दर्शना अशीलवार म्हणल्या, पूर्वी पाण्यात खारटपणा होता. आता गोडपाणी मिळते.

पचायला हलके वाटते, पोट फुगल्यासारखे वाटत नाही. मुले म्हणाली पूर्वी पाणी खारट लागत होते. आता आम्ही शाळेत पिण्यासाठी हेच पाणी वापरतो. मार अंगणवाडी शिक्षिका यमुताई काकडे म्हणाल्या, अंगणवाडीत पिण्यासाठी आम्ही येथील पाणी वापरत आहोत.