गाढव व कुत्रा

एका लोणाऱ्याचा कोळसे व खाण्याचे पदार्थ लादलेला गाढव रस्त्यानें चालला होता, त्याचा धनी त्यास हांकीत होता व त्याचा भुकेलेला कुत्राही धापा टाकीत मागून येत होता. कांही वेळानें तो लोणारी चालण्याने थकून जाऊन एका झाडाखाली झोंपी गेला व गाढव इकडेतिकडे चरूं लागला. कुत्र्यास फार भूक लागली होती म्हणून त्यानें गाढवास विनंती केली कीं, ‘तुझ्या पाठीवरील खाण्याच्या पदार्थापैकी माझा हिस्सा मला देशील, तर तो खाऊन माझी भूक मी शांत करीन !’ गाढव म्हणाला, ‘थांब, घाई करूं नकोस. आपला धनी जागा झाला म्हणजे तो तुला तुझा हिस्सा देईल; तोपर्यंत दम धर.’ हें ऐकून कुत्रा बिचारा स्वस्थ राहिला. इतक्यांत जवळच्या जंगलांतून एक मोठा लांडगा उडया टाकीत आला आणि त्या गाढवाच्या मानगुटीस बसला. तेव्हां गाढव कुत्र्यास म्हणतो, ‘अरे धांव आणि या क्रूर प्राण्याच्या हातून मला सोडीव.’ कुत्रा उत्तर करितो, ‘थांब, घाई करूं नकोस; आपला धनी जागा झाला म्हणजे तो तुला सोडवील, तोपर्यंत दम धर.’ कुत्र्याचे हे भाषण पुरे झाले नाही, तोच त्या गाढवाचे नरडे फोडून लांडग्याने त्यास ठार मारून टाकिले !

तात्पर्य:- दुसऱ्यांनी आपणास मदत करावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपणही दुसऱ्यास मदत केली पाहिजे.