गाढवाचे पोर आणि रानडुक्कर

एका गाढवाच्या पोराची आणि रानडुकराची रानात गाठ पडली. त्या वेळी गाढव थट्टेने रानदुकरास म्हणाले, ‘रामराम हो भाऊ रामराम !’ गाढवाची ही सलगी पाहून डुकरास मोठे आश्चर्य वाटले, आणि त्यास इतका राग आला की, त्याची आतडीच बाहेर काढावी, असे त्याच्या मनात आले. पण त्याने विचार करून आप्ला राग आवरला. तो गाढवास म्हणाला, ‘रे हलक्या प्राण्या, तू आपल्या वाटेने जा. तुझा जीव घ्यावयास मला एक क्षणही लागणार नाही, पण गाढवाच्या रक्ताने आपले तोंड विटाळण्याची माझी इच्छा नसल्यामुळे मी तुला सोडून देतो.’

तात्पर्य:- मुर्ख लोक आपणास शहाणे समजून थोरांची चेष्टा करावयास जातात, त्यांपासून ते आपला जीव घेऊन परत आले, म्हणजे त्यांनी फार मिळवले म्हणून समजावे.