गळकरी आणि मासा

एका मनुष्याने नदीत गळ टाकला, त्यास एक मासा लागला. त्यास तो मनुष्य टोपलीत टाकतो आहे, इतक्यात तो मासा त्याची प्रार्थना करू लागला, ‘हे पुण्यपुरुषा, कृपा करून मला पुनः नदीत टाक.’ कोळ्याने त्यास विचारले, ‘अरे, मी तुजवर एवढा उपकार का करावा बरे ?’ मासा म्हणतो, ‘मी आज अगदी लहान आहे, त्यामुळे आज तुला माझा फारसा उपयोग होणार नाही; मी मोठा झाल्यावर तुला माझा फार उपयोग होईल.’ गळकरी उत्तर करतो, ‘होय, तू म्हणतोस ते खरे आहे; पण पुढे प्राप्त होणाऱ्या वस्तूच्या आशेनेआज हती आलेली वस्तु टाकून देण्याइतका मी खचितच मूर्ख नाही.’

तात्पर्य:- हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा वेडेपणा होय.