गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक

महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिले. हे आपल्याला माहीत आहेच. पण व्यासमहर्षी महाभारत कथन करीत असता ते लिहून घेण्याचे कार्य गणपतीने केले होते हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे.

पण जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचे ठरविले तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करुन एकट्याने लिहून काढणे आपणास शक्य नसल्याचे त्यांना जाणवले. तसेच सर्व देवांमध्येही त्यांना तोडीचा लेखनिक कोणीच आढळेना. मग महर्षी व्यास ब्रह्मदेवाकडे गेले.

ब्रह्मदेवांना महर्षी व्यास म्हणाले, ‘हे देवाधिदेव! मी माझ्या जीवनातल्या अनुभवावर आधारित महाभारत ग्रंथ लिहिण्याचे ठरविले आहे. परंतु विचार करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ते लिहून काढणे मला एकट्याला शक्य नाही. तेव्हा मला मी सांगितलेले समजून घेऊन प्रत्येक श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजावून लिहिणारा लेखनिक सहाय्यक म्हणून हवा आहे.’

हे ऐकून ब्रह्मदेव महर्षीव्यासांना म्हणाले, हे महामुनी! तुमचा ‘महाभारत’ लिहिण्याचा संकल्प स्तुत्यच आहे. तुम्ही हे सुंदर कार्य लवकरच पूर्ण कराल, अशी माझी खात्री आहे आणि तुमचे हे लेखनकार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसतीपुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून तुम्ही गणेशासच तुमच्या या कार्यासाठी तयार करा.

ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले व त्यास विनंती करून म्हणाले, ‘हे गणेशा! ब्रह्मदेवाच्या सांगण्यवरून मी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या ‘महाभारत’ लेखनकामी तुम्ही मला सहाय्य करावे अशी माझी इच्छा आहे.’

व्यासांचे म्हणणे ऐकून गणेश त्यांना म्हणाला, ‘महर्षी, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण माझीसुद्धा एक अट आहे.’ तेव्हा व्यासांनी विचारले, ‘कोणती अट?’

तेहा गणेशाने महर्षी व्यासांना आपली अट सांगितली, ‘मी लिहिताना तुम्ही न थांबता कथन करावे. जर तुम्हीमध्येच थांबलात तर माझी एकाग्रता भंग होईल. तसेच मध्ये वेळ दवडणेसुद्धा मला आवडणार नाही. मध्येच माझी एकाग्रता भंग झाल्यास मी माझ्या कामात एकसूत्रता आणू शकणार नाही. तुम्हाल आ जर असे न थांबता सतत सांगता येत असेल तरच मी तुमचा लखनिक होण्यास तयार आहे.

महर्षी व्यासांची गणेशाची अट मान्य केली आणि म्हणाले, ‘हे विघनहर्त्या! मला तुमची अट मान्य आहे. पण तूसुद्धा मी जेजे काही सांगेन ते अर्थ समजल्याशिवाय लिहायचे नाहीस. प्रत्येक श्लोकाचा अर्थ प्रथम नीट समजून घेऊन लिहिणे हे महाभारत लेखनाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजल्यावाचून लिहिणे हे कदापिही शक्य आणि योग्य होणार नाही.’

गणेशानेही महर्षी व्यासांचे म्हणणे मान्य केले. मग महर्षींनी कथानकास सुरुवात केली. प्रत्येक श्लोक सांगितल्यावर वेदव्यास गोष्ट सांगत व गणेश ती लिहून काढीत असे. महाभारत कथन करता करता व्यासांच्या लक्षात आले की गणेश अर्थ समजून घेऊनही खूपच जलद गतीने लिहू शकतो आहे. तेव्हा त्यांनी अधिकाधिक कठीण व गहन श्लोक सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचा अर्थ समजून घेऊन लिहिण्यास गणेशास जास्त वेळ लागू लागला. तेवढ्या वेळात मग महर्षीव्यास नवीन श्लोक रचून तयार ठेवत.
अशा प्रकारे महाभारत सहजतेनेपूर्ण झाले आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो.