गणपतीची मातृ-पितृ

एके दिवशी कैलासावर शंकर-पार्वती बसून गुजगोष्टी करीत होते. जवळच त्यांचे पुत्र गजानन व कार्तिकेय हे खेळत होते. त्यांना एकत्र आनंदाने खेळताना पाहून शंकर-पार्वती आनंदित होत होते.इतक्यात खेळता-खेळता त्यांचे भांडण जुंपले.

कार्तिकेय गजाननास म्हणाला, “अरे गणेशा, तू असा ढेरपोट्या, अगडबंब! आणि तुझं वाहनमात्र पिटुकला उंदीर, तो तुझ्या भारानेच दबत असेल. तो रे काय कामाचा? माझं वाहन मोर बघ! माझ्या देहाला अनुरूप आहे आणि सुंदर व चपळही! तुझा हा एवढासा. कसातरी दिसणारा उंदीर… शी!”

त्यावर गजानना म्हणाला, “असू दे कसातरी दिसणारा पिटुकला उंदीर माझे वाहन! पण तोही चपळ आहे. तुझ्या सुंदर मोराचे पाय बघ- काटकुळे! शी!”
त्या दोघांचे भांडण काही आवरेना शेवटी आपल्यापैकी कोणाचे वाहन योग्य याचा निकाल लावण्यासाठी दोघेही आले शंकर-पार्वतीपाशी तेव्हा त्या दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन पार्वती त्यांना म्हणाली, ‘हे बघा, तुम्हा दोघांपैकी जो कुणी प्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचेच म्हणणे बरोबर असेल.’

तेव्हा कार्तिकेयास ही अदा अगदी सोपी वाटली आणि ‘आपलेच म्हणणे बरोबर ठरेल. कारण आपणच पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वप्रथम पूर्ण करू.’ अशी बढाई मारून तो मोरावर स्वार होऊन पृथ्वीप्रदक्षिणेस निघून गेला. जाताना तो गणपतीस चिडवून म्हणाला, ‘आता बघ माझ्या मोरावरून मी कसा चुटकीसरशी पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करतो ते. तुझा हा पिटुकला उंदीर तुझा भार घेऊन दहा पावलं तरी पुढे जातो का बघ!’

गजाननाने मात्र शांतपणे त्याची ही थट्टा ऐकून घेतली कार्तिकेय निघून गेल्यावर त्याने सरोवरावर जाऊन स्नान केले. आणि तसेच ओलेत्याने आपल्या उंदरावर बसून शंकर-पार्वती बसलेले होते तेथे आला.

तो त्यांना म्हणाला, ‘जन्म देणारे मातापिता म्हणजे आपली पृथ्वी! त्यांना प्रदक्षिणा हीच माझी खरी पृथ्वीप्रदक्षिणा!’ आणि असे सांगून त्याने शंकर-पार्वतीना सात प्रदक्षिणा घातल्या व शंकर-पार्वतीजवळ गजानन बसून राहिले.

थोड्या वेळाने कार्तिकेय पृथ्वीप्रदक्षिणा करून आले. तेव्हा पार्वती त्याला म्हणाली, ‘कार्तिकेया, आमची अट गजाननाने जिंकली आहे. तो बुद्धीमान आहे. त्याने तुझ्या आधी पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली आहे.’

हे ऐऊन कार्तिकेयास राग आला. त्याने रागातच विचारले, ‘हे काय गणपतीने पृथ्वीप्रदक्षिणा इतक्या लवकर कशी पूर्ण केली?’
तेव्हा पार्वती म्हणाली, ‘पुत्रा! गणेशाने मला व शंकरांना सात प्रदक्षिणा घातल्या. माता-पित्यांना घातलेल्या प्रदक्षिणेमुळे पृथ्वी-प्रदक्षिणेचेच फळ मिळते.
असेच शास्त्रवचन आहे.

पार्वतीचे हे बोलणे ऐकून कार्तिकेय पार्वतीवर भयंकर संतापला व म्हणाला तुला गणेश प्रिय असल्याने तू त्याची बाजू घेऊन युक्तिवाद करते आहेस. तुझे माझ्यावर प्रेम नाही. आपल्या दोन मुलांमध्ये तू पक्षपात करते आहेस! छे छे! यापुढे मी तुझेच काय, पण त्रैलोक्यातील कोणत्याही स्त्रीचे तोंड पाहणार नाही.’

अशी प्रतिज्ञा करून तो रुसून क्रौंचगिरी पर्वतावर निघून गेला. आणि आजन्म ब्रह्मचारीच राहिला.

अशाप्रकारे गणपतीने आपल्या बुद्धीकौशल्याच्या सामर्थ्यावर आपल्या माता-पित्यांचे प्रेम जिंकले.

मग मुलांनो, तुम्हीसुद्धा असेच गणेशाप्रमाणे बुद्धिमान होणार ना? गणेशाप्रमाणेच आपल्या मातापित्यांना सर्वोच्च मान द्या. मग गणपतीबाप्पा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देतील.