गणपतीला दुर्वा प्रिय

गणपतीला दुर्वा प्रिय

गणपतीला दुर्वा प्रिय

एकदा यमाच्या नगरात खूप मोठा उत्सव चालू होता. त्या उत्सवात अनेक अप्सरा, नृत्यांगना नृत्य करीत होत्या. त्या उत्सवात तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्यावर यम मोहीत झाला आणि त्यामुळे ‘अनलासुर’ नावाचा एक भयंकर अक्राळविक्राळ राक्षस निर्माण झाला. अनलासुर जेथे जाई तेथे अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होई. असा भयंकर राक्षस देवांच्या मागे लागला. त्यामुळे घाबरलेल्या देवांनी श्रीगणेशाची आराधना सुरू केली. तेव्हा श्रीगणेश बालरुपात तेथे प्रगट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अनलासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.

तेवढ्यात दशदिशा भस्म करीत अनलासुर तेथे आला. त्याला तेथे पाहून सर्व देव घाबरून सैरावैरा पळत सुटले. पण बालरुपातले श्रीगणेश तेथेच उभे राहिले. ते पाहून अनलासुर त्यांना गिळायला पुढे झाला. पण बालगजानननेच त्याला गिळून टाकले. साक्षात अग्निरुप नलासुरालाच गिळल्याने श्रीगणेशाच्या सर्वांगाला दाह होऊ लागला. तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला. त्यावेळी सर्व देव तेथे आले. गणेशाच्या सर्वांगाचा दाह होत असलेला पाहून ते विविध उपाय करू लागले.

इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या मानसकन्या त्याला अर्पण केल्या. विष्णूंनी आपल्या हातातील थंडगार कमल दिले. वरुणाने थंडगार जलाचा अभिषेक केल. शंकराने आपला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला. सारे सारे उपाय झाले. पण तरीही दाह शांत होईना.

तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर वाहिल्या. तेव्हा गजाननाच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले, ‘अनेकविध उपायांनीसुद्धा माझ्या अंगाचा दाह कमी झाला नाही. दुर्वांनी मात्र माझ्या अंगाचा दाह कमी झाला. म्हणून यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल.’ तेव्हापासून अनलासुराचा प्रशम केला म्हणून गजाननाला ‘कालावनप्रशमन’ असे नाव प्राप्त झाले. सर्व देवांनी त्या ठिकाणी एक सुंदर देवालय निर्माण करून त्यामध्ये गजानमूर्तीची स्थापना केली आणि त्याला विघ्नहर असे नाव दिले.

One thought on “गणपतीला दुर्वा प्रिय

Comments are closed.