गप्पीदास

एक मनुष्य इतका आजारी पडला की, तो आता जगणार नाही, असे सगळ्या वैदयांनी सांगितले. मग त्या मनुष्याने देवास नवस केला की, ‘देवा, मला तू या दुखण्यातून बरा कर म्हणजे मी तुला हजार पुतळ्या घालीन.’ हे ऐकून त्याची बायको त्यास म्हणाली, ‘असला अशक्य नवस तुम्ही करू नका. आपण गरीब माणसे, हजार पुतळया आपणास कशा मिळणार ?’ यावर त्या मनुष्याने उत्तर केले, ‘देवास दुसरे पुष्कळ उदयोग आहेत, ते सगळे सोडून हजार पुतळयासाठी माझ्या दारी तो काही धरणे धरून बसणार नाही.’ पुढे तो मनुष्य लवकरच बरा झाला व पिठाच्या हजार पुतळया देवास देऊन त्याने आपले नवस फेडला!

याने आपणास अशा रितीने फसविले हे पाहून देवास मोठा राग आला. मग तो भुताचे सोंग घेऊन त्या मनुष्याच्या स्वप्नात गेला व त्यास म्हणाला, ‘अरे तू उदया रानात जाऊन डोंगराच्या पायथ्याशी खणून पहा, तेथे तुला पुष्कळ द्रव्य सापडेल.’ दुसरे दिवशी, तो मनुष्य द्रव्य खणून काढण्यासाठी रानात गेला तो तेथे त्यास चोरांनी पकडले. आपणास सोडून देण्याविषयी त्याने त्यांची पुष्कळ विनवणी केली व त्यास एक हजार मोहरा देण्याची लालूचही दाखविली. परंतु चोरांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेविला नाही. ते त्यास घेऊन गेले व शेवटी त्यांनी त्यास गुलाम म्हणून विकून टाकले.

तात्पर्य:- अमुक करू आणि तमुक करू, अशा गप्पा फार दिवस चालत नसतात.