गीतरामायण

गीतरामायण | Geet Ramayan Introduction

गीत रामायण

गीत रामायण

वाल्मीकी महामुनि हे ‘आदिकवि’. त्यांनी रचलेले रामायण हे ‘महाकाव्य’. त्याचा नायक श्रीरामचंद्र हा ‘मर्यादा पुरुषोत्तम’. त्याचा सेवक श्री हनुमान हा ‘चिरंजीव’ दासोत्तम. रामाचे राज्य ‘आदर्श रामराज्य’. अशा प्रकारे श्रीरामकथा आमच्या भारताच्या दशदिशांमध्ये आज सहस्त्रों वर्षे दुमदुमून राहिली आहे. भारतीय संस्कृति रामरसांत सतत भिजत आलेली आहे. अशी रामकथा गाऊनआपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी आणि नाटककारांनी आपली प्रतिभा सर्वस्वाने वेचली आहे. परिणामी रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभर भाअर्तीय साहित्यात डौलाने उभा राहिलेला आहे. रामथांचे पाठ देणारे पुराणिक, रामकथा गाणारे कीर्तनकार, पिढ्यानपिढ्या भारतीय जनांच्या मनाचे मशागत करीत आलेले आहेत भारतातील सर्व भाषांत रामकथेचे गायन अहोरात्र चालू आहे.

श्री तुलसीदासाम्चे रामायन नित्य पठन करणारे नऊ-दहा कोटि लोक आहेत. प्रियर्सन प्रभुति पाश्चात्य लेखकांचाहि तसाच अभिप्राय आहे. उत्तर भारतातील हिंदी पंडित आणि आधुनिक आचार्य तुलसीदासाच्या अध्ययन-मननांत गर्क आहेत अतिदक्षिणेत तामिळनाडमधील कविचक्रवर्ती कंबन याचे रामायन तिकडे तसेच लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात एकनाथ, कृष्णदास मुद्गल, श्रीसमर्थ आदि संतकवींनी मराठी जनतेस रामायण चालविले आहे. मोरोपंताना तर रामायणाने वेड लाविले होते. भिन्नभिन्न प्रकारांनी मोरोपंत रामायण गातच राहिले. आणि “श्रीरामायन गाईलें तरि पुनः गाविचि ऐसें करी” अशी आळवणी त्यांनी केली आहे. अशी एकशे आठ रामायणें मोरोपंतानी रचलीं. निरनिराळ्या मराठी कवींच्या रामायणांतील येथे घेऊन कै. वा. लक्ष्मणराव पागारकर यांनी एक छोटेसे “कविरामायण ” चयनरूपाने प्रसिद्ध केलें डॉ. मराठे यांचें एक सुबोध ओवीबद्ध “झोपाळ्यावरचे रामायण” उपलब्ध आहे. आणि परवाच्याच रामनवमीच्या सुमुहूर्तावर डॉ. कुलकर्णी यांचे ‘प्रसाद रामायण’ प्रसिद्ध झाले. रामस्तोत्रांना तर मित्ति नाही. नाटकें, चरित्रेंही मराठीत रचली गेली आहेत. एवढे होऊनही ना कवींची तृप्ति झाली, ना जनांचें समाधान झालें. रामकथा वाल्मीकीच्या काळाइतकीच आजही टवटवीत आणि सुगंधित राहिली आहे.

रामकथा तीच, पण गाणाऱ्या दृष्टीकोन, धाटणी आणि कौशल्य भिन्नभिन्न होऊन रामायणाची शोभा आगळीच वाढत राहिली आहे. अशा रामकथेवर अलीकडे माणदेशाच्या मातीतूनौदयास आलेले अस्सल मराठी बाण्याचे कवि . श्री. ग. दि. माडगुळकर यांनी आपल्या ‘गीतरामायणा’चा कौस्तुभमणी महाराष्ट्रशारदेश्च्या कंठात बांधला आहे.

माडगुळकरांचे ‘गीतरामायण’ श्री. सुधीर फडके यांच्या सुस्वरकंठातून आकाशवाणीवरून बाहेर पडताच साऱ्या महाराष्ट्राने आपल्या ‘सर्वेद्रियांचे कान’ केले ते अजून तसेच लावलेले आहेत. माडगूळकरांच्या ‘गीतरामायण’ने महाराष्ट्र कोंदून गेला आहे. ते त्यांचे अनुरूप शब्द, ती त्यांची सुश्लिष्ट रचना, त्या गीतांच्या मधूर चाली, त्यांतील प्रसंगानुकूल भावाविष्कार अशी सर्वांगसंपन्नता दृष्टीस पडताच, श्री सहज बोलून गेली की, माडगूळकर हे यथार्थाने ‘आधुनिक वाल्मीकि’ शोभतात, खरोखर आमचेमाडगूळकर वरदी कवि आहेत. यात काडीचीही अतिशयोक्ति नाही. शंकर पार्वतीला गहन गुह्य तत्वज्ञान सांगत असता. ते आईच्या पोटात असलेल्या मच्छेंद्रनाथांनी ऐकिले. तद्वत माडगूळकरांचेही झाले असावें. इतके ते रामकथेशी समरस झालेले आहेत. तथपि, ज्या आधुनिक काळांत माडगूळकर वावरत आहेत, त्या काळची नाडीही त्यांना सापडलेली आहे. कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून त्यांनी गीतरूपाने प्रकट केला आहे. आजच्या लगबीच्या काळात, लोकांची सवड पाहून अवघ्या छ़प्पन गीतांत त्यांनी आपले रामायण बांधलें आहे. गीते बांधताना कथाभागाचा विस्तार बाजूस ठेवून एक घटना घ्यावी आणि श्रुतिमनोहर एकदोन ओळींचा जडाव झळकत सोडून द्यावा आणि तोच आठदहा कडव्यांत मनोहर रीतीने फुलवावा असा की, वाचणाऱ्याने किंवा ऐकणाऱ्याने आपल्या तोंडातून एकदम वाहवाची दाद द्यावी, ‘शाब्बास पठ्ठे’ म्हणावे.

वाल्मीकींच्या रामायणांत करुण आणि वीर रसांचा उत्कर्ष आहे. रौद्र, भयानक, अद्भुतादि रगांचेही प्रसंग त्यात आहेत. सर्वच रामायण नितांत मधुर आहे. आणि गेय गीतांच्या द्वारे रामायणातील या गोडीचे आकंठ पान लोकांना करवावे, हाच माडगूळकरांच्या ‘गीत रामायण’ चा प्रधान हेतु दिसतो. याउलट समर्थकाळी ‘या ध्यानें बंदमोचने’ असा रावणाच्या बंदित पडालेल्या देवदिकांच्या मुक्तीचा हेतु लोकांच्या मनावर ठसविणे असा समर्थांचा प्रधान उद्देश दिसून येतो. ‘गणेश गाढवें वळी’ अशा प्रकारची आपत्ति सर्व देवांवर आली. असे बंदीत पडलेले देव सोडविणारा आर्दश राम रेखाटण्यात, जुलमी जोखडातून आपल्या बांधवांची सुटका व्हावी अशी रामदासांची तळमळ दिसून येते. माडगूळकरांचा हेतु त्यांच्या गीतांनी सफल झाला आहे. गीते ही गाण्यासाठी असल्यामुळे साहजिकच लोकांच्या कंठात बसतात. माडगूळकरांच्या गीतांना फडक्यांचा कंठ लाभला. त्यामुळे एका गोड संगमात डुंबत राहण्याचे सुख सहस्त्रावधि जनांना उपभोगण्यास मिळत आहे.

प्रस्तुतची सर्वच गीते मधुर आहेत. ती घोळून घोळून म्हणण्याचा मोह पडल्याशिवाय राहात नाही. तथापि काही गीतांना अशी चाल लागली आहे. आणि त्यांचा असा रंग उतरला आहे की, तो तो प्रसंग जणु डोळ्यांसमोर घडतो आहे अशी भावना बळावून श्रोत्यांची शरीरे तदनुकूल हालचाली करू लागतात. रामजन्माचे गीत पाहा : प्रजांना वाटणारा आनंद त्या गीतात ओसंडून जात आहे. ‘मार ही त्राटिका’ हे गीत ऐकून आताच त्राटिकेच्या अंगावर धावून जावेसे वाटते. गूहक जेव्हा रामाला पार करण्यासाठी होडी वल्हवू लागतो आणि ‘जय गंगे जय भागीरथी’चा घोष करतो त्या वेळी आपण गूहकाला खेटून होडीत बसलो आहो आणि होडीची वल्ही मारीत आहो, असा भाग झाल्याशिवाय राहात नाही. ‘असा हा एकच श्रीहनुमान’ या जांबुवानाच्या शब्दाबरोबर आपले हात नकळत टाळी वाजवितात. वानरगण ‘सेतू बांधा रे सागरी’ अशी गर्जना करतात तेव्हा आपणांलाही चेव येतो. ‘मज सांग लक्ष्मणा जाउ कुठे ?” असा असहाय सीतेचा करुण प्रश्न ऐकून आपले डोळें पाणावू लागतात. अशा काही गीतांतून माडगूळकरांचे प्रतिभास्फुरण अतिशय प्रेरक झाले आहे.

गीत रामायण वाचून संपविले आणि घटकाभर मनात विचार केला; तेव्हा ‘आदी रामतपोवनादिगमनं एतद्धि रमायणम्‌’ हा श्लोक आठवला आणि रामाच्या वनाभिगमनापूर्वी घडलेला त्याचा जन्म आणि बाललीला यांची जोड दिल्यास आपोआपच माडगूळकरांनी गीतांना धरलेला क्रम बेमालूम जुळतो हे ध्यानात येऊन मनाला मोठि चमत्कृति वाटते.

गीत रामायणानंतर ‘गीत कृष्णायन’ ‘गीत दासायन’ अशी परंपरा या आधुनिक वाल्मीकीपासून सुरू झाली हे लक्षात येते. म्हणून या परंपरेचे आदिकवि माडगूळकरच ठरतात. वाल्मीकींचे संस्कृत रामायण असो की माडगूळकरांचे गीत रामायण असो, माडगूळकरांच्या शब्दात सांगावयाचें तर, अभिप्राय एकच – ‘काव्य नव्हे हा अमृतसंचय’.

माडगूळकरांचे हे ‘गीत रामायण’ कसे जन्माला आले त्याची कथा कवि पद्मश्री बा. भ. बोरकर यांनी दहा वर्षांपूर्वी निघालेल्या ‘गीत रामायणा’च्या पहिल्या आवृत्तीत कथन केली आहे. ‘गीत रामायण’च्या चार आवृत्त्या होऊन गेल्या. आणि पहिल्या आवृत्तीनंतर बरोबर दहा वर्षांनी पाचव्या आवृत्तीचा पाळणा हालत आहे. या सुमुहूर्तावर ‘गीत रामायणाचे’ जातक वर्तविण्याकरिता मला बोलावण केले. ‘चिरंजीव’ हनुमंताच्या तोंडून माडगूळकरानीच हे वदविले आहे –

“जोवरि हे जग, जोवरि भाषण
तोवरि नूतन नित रामायण”

श्री हनुमानजयंती, १८८९