घर व कुटुंब

आतापर्यंत ज्यांचे विवेचन झाले ते सारे संस्कार घरात होतात. असे आपण म्हटले. इंग्रजी भाषेत दोन शब्द आहेत. House व Home पण अशा दोन शब्दांची आम्ह हिंदूंना फारशी आवश्यकता कधी भासली नाही. घर म्हणजे इमारत, त्यात रहाणारे कुटुंग, झाडेझुडपे, प्राणी-सगळे आपलेच. शाळा सुटल्यावर मुला-मुलींना, कार्यालआतील कामाची वेळ संपल्यावर स्त्री-पुरुषांना, बराच काळ काही कारणाने बाहेरगावी राहिल्यानंतर त्या व्यक्तीला घरी जाण्याची ओढ लागते. कारण घर म्हणजे आपलेपणा, प्रेम, सहानुभूती, प्रस्परांना समजून घेण्याची वृत्ती, मन मोकळे करण्याची जागा.

सुरक्षिततेचा भाव, वाट पाहणारे कुणीतरी असणे अन असेच कितीतरी ! या सर्व गोष्टी अवलंबून असतात कुटुंबीयांच्या परस्पर व्यवहारावर ! रा. स्व. संघाचे सध्याचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. रंगाहरीजींनी बोलताबोलता एक उल्लेख सहज केला. ते अमेरिकेत गेले होते. त्यांची निवासाची सोय हॉटेलमध्ये केली होती. भेटायला आलेले एकाने विचारले, “ कैसे हो ? ” रंगाहरीजी उत्तरले, Hotelsick बन गया हूँ ! ” हॉटेलमध्ये सोय असते. प्रेम मात्र नसते. घरात दोन्ही असते.

एकदा एक वर्गावर एक शिक्षिका शिकवीत होत्या. एका मुलाला ताप भरला होता त्याच्या डोळ्यांवरून व चेहऱ्यावरून ते लक्षात आल्यानंतर जवळ जाऊन त्यांनी त्याच्या अंगाला हात लावला. त्या मुलाने चटकन आपले डोके त्यांच्या अंगावर टेकवले. शिक्षिकेने त्याला थोपटत म्हटले, “ तुला चांगलाच ताप भरलाय. घरी जा. रिक्षा आणायला सांगते व सोबत तुझा मित्र येईल. ” तो मुलगा म्हणाला, “ बाई, मी घरी जात नाही. घरी कोणी नसते. आईबाबा ऑफिसात गेलेले आहेत. पण तुम्ही मला थोपटले. आता बरे वाटेल. ”

ही सहानुभूती, हा दिलासा, हा मायेचा स्पर्श, ही आश्वासकता कुंटुंबीयांकडून सहजगत्या मिळत असते, परस्परांबद्द्लचा जो स्नेह असतो तो एकमेकांची काळजी घेणे, मदत करणे, सेवा करणे, मन सांभाळणे या सर्व गोष्टी करवून घेत असतो. महात्मा गांधीजी विदेशात जायला निघाले. “मदिरा, मदिराक्षी व मांस यांना मी स्पर्श करणार “,असे वचन त्यांच्या आईने त्यांच्याकडून घेतले. अन्‌ आईवरील त्यांच्या मनातील प्रेमाने, स्वयंनिष्टेने व आईच्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाने ते वचन पाळले गेले.